पात्र दिव्यांग बांधवांनी मतदार नोंदणी करावी – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
- दिव्यांग बांधवांसाठी आयोजित कार्यशाळेत 65 व्यक्तींची मतदार नोंदणी
लातूर, दि. 15 (जिमाका): राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील मतदारांची नोंदणी सुरु असून पात्र दिव्यांग बांधवांनीही या मोहिमेंतर्गत आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिव्यांग बांधवांच्या कार्यशाळेत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष नाईकवाडी, राज्य दिव्यांग निवडणूक दूत बस्वराज पैके आदी उपस्थित होते. याप्रसंगी घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी शिबिरात 65 पात्र दिव्यांग बांधवांची नव्याने मतदार नोंदणी करण्यात आली.
मतदान हा आपला हक्क असून मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र व्यक्तीने आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.