येणाऱ्या नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये देशातील पाच महत्त्वपूर्ण राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या निवडणुका आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या तिन्ही राज्यांबाबत निवडणूकपूर्व विधानसभा जागांचा अंदाज एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. मागील महिन्यात भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे या हिंदीबहुल पट्ट्यातील तिन्ही राज्यांमध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, निवडणुकांना दोन-तीन महिन्यांचा कालावधी बाकी असताना आता एक सर्वेक्षणातून निवडणुकांच्या अंदाजाबाबत ताजी आकडेवारी समोर आली आहे. या सर्वेक्षणात या तिन्ही राज्यातील जनतेची मते जाणून घेण्यात आली आहेत. आगामी निवडणुकीत कोणाचे सरकार या राज्यांमध्ये येऊ शकते? याबाबत सर्वेक्षणातून अंदाज व्यक्त करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशात कमळ फुलणार –
IANS-Pollstrat या संस्थेने मध्य प्रदेशातील 7,883 लोकांचे मत सर्वेक्षणात घेतले आहे. यासर्वेक्षणाच्या दाव्यानुसार मध्य प्रदेशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. विधानसभेच्या एकूण 230 जागांपैकी भाजपला 116 ते 124 जागा मिळू शकतात, असा दावा या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. तर काँग्रेसला केवळ 104 जागा मिळतील असे निष्कर्ष नोंदवण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशातील जनतेने लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान यांना सर्वाधिक मतदान केले आहे. एकूण 40 टक्के लोकांना चौहान पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते
राजस्थानमध्ये गेहलोत यांचीच जादू –
IANS-Pollstrat ने राजस्थानमधील 6,705 लोकांच्या सहभागातून सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार राजस्थानमधील विधानसभेच्या 200 जागांपैकी काँग्रेसला 97 ते 105 जागा मिळण्याचा अंदाज सांगितला गेला आहे. याचाच अर्थ राज्यात काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. तर या उलट भाजपला राजस्थानमध्ये 89 ते 97 जागा मिळू शकतात. सर्वेक्षणात लोकांना त्यांचा आवडता मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारल्यानंतर अशोक गेहलोत यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. सर्वेक्षणातील सहभागी लोकांपैकी 38 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून गेहलोत यांना पसंती दर्शवली.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार आहे :
छत्तीसगडमध्ये IANS-Pollstrat ने एकूण 3,672 लोकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार आहे. छत्तीसगडमधील विधानसभेच्या 90 जागांपैकी काँग्रेसला 62 जागा मिळू शकतात. तर भाजपला केवळ 27 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.