महाराष्ट्र महाविद्यालयात ‘अ’ झोन अंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांना सुरुवात
निलंगा – नांदेड विद्यापीठ अंतर्गत असलेल्या लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यातील महिला व पुरुषांच्या ‘अ’ झोन
अंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा आजपासून निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या इनडोअर हॉलमध्ये मॅटवर सुरू झाल्या. काळया मातीत खेळला जाणारा हा खेळ बदलत्या काळानुसार आता मॅटवर खेळला जाऊ लागलेला आहे. त्यामुळे निलंगावाशियांमध्ये या खेळाबद्दल एक वेगळी उत्सुकता निर्माण झालेली दिसली.
या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खो- खो पटू व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू मा.सारिका काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपूके, महाराष्ट्र ज्यु. कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. महेश बेंद्रे, शारीरिक शिक्षण बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन डॉ. कैलास पाळणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ‘अ’ झोन स्पोर्टस् कौन्सिलचे सचिव डॉ. अशोक वाघमारे यांची उपस्थिती होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यातून पुरुषांच्या १२ टीम व महिलांच्या ०८ टीम असे एकूण २४० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. स्पर्धा व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री. विजयकुमार पाटील निलंगेकर ,सचिव मा. बब्रूवानजी सरतापे, प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपूके, क्रीडा संचालक डॉ. गोपाळ मोघे व महाविद्यालयात कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने गठीत केलेल्या विविध समित्या जातीने लक्ष ठेवून आहेत.