भाजपाने रामराज्य आणण्याचे आश्वासन दिले होते, हे रामराज्य आहे का रावणराज ? हे तर रावणराज्यच आहे. रावणाने सीतामातेचे अपहरण केले तोही उद्ध्वस्थ झाला व द्रौपदीचे वस्त्रहरण करणारे कौरवही उद्ध्वस्थ झाले. ज्यांनी ज्यांनी महिलांवर अत्याचार व अन्याय केला त्यांचे हेच होणार, भाजपाचेही तेच होणार, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.दरम्यान नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, उंचावणाऱ्या महिला खेळाडूंवर अत्याचार करणारा भाजपाचा खासदार ताठ मानेने फिरतो, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. महाराष्ट्रातून 7 हजार महिला-मुली गायब झाल्या आहेत त्याची पोलिस स्टेशनमध्ये नोंदही नाही. सावित्रीबाईच्या राज्यातून महिला व मुली गायब होत आहेत हे दुर्दैवी आहे. ते भंडारा जिल्ह्यात काँग्रेसच्या यात्रेत बोलत होते.
भाजपने जनतेला फसवले
नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला फसवले आहे. 2014 साली नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली व सत्तेत येताच आश्वासनांना हरताळ फासला. यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ करताना मोदींनी भाजपाचे सरकार आले तर शेतकऱ्यांचा खर्च कमी करेन, उत्पन्न दुप्पट करेन व पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची करेन असे आश्वासन दिले होते. प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख देणार, दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार अशी आश्वासने दिली आणि सत्तेत आल्यानंतर मात्र हा तर निवडणुकीतील ‘जुमला’ होता असे सांगून जनतेची फसवणूक केली. आता या भाजपाला असा ‘जुमला’ दाखवा की पुन्हा सत्तेत येणार नाहीत, असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
भाजप सरकारने जनतेसाठी काही केले नाही
जनसंवाद यात्रेदरम्यान भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे बोलताना नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचा खरपूस समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, 15 लाखांच्या आश्वासनला आपण भुललो, शेतकरीही दुप्पट उत्पनाच्या आश्वासनावर भुलले, तरुणही 2 कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनाला भुलले आणि बहुमताने भाजपाला सत्ता दिली. मागील 9 वर्षात भाजपाच्या सरकारने जनतेसाठी काहीही केलेले नाही. काँग्रेसची सत्ता असताना बँकेतील पैशावर व्याज मिळत होते आता मोदी सरकार असताना तुमच्याच पैशावर कर घेतला जातो.
पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली
नाना पटोले म्हणाले की, जीएसटीने सर्वांचे नुकसान केले आहे. सर्व वस्तूंवर जीएसटी लावला आहे आणि हा कर गोळा करुन मोदींनी मित्रोंची 16 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. मोदी सरकारने तरुणांना फसवले, शेतकऱ्यांना फसवले, गरिबांनाही फसवले. पंतप्रधान मोदींनी एक घोषणा केली होती 2022 पर्यंत सर्वांना घरे देणार, “सब को मिलेगा घर, घर में होगा नल और नल में होगा जल” पण तसे झाले का? सगळ्यांना घरे मिळाली का? मोदींनी खोटे बोलून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे.