राज्यातील सत्ता संघर्षानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रते संदर्भातील महत्त्वाची सुनावणी आजपासून सुरू झाली. या सुनावणीसाठी ठाकरे गटाचे सर्व आमदार हजर होते. तर याचिकेची प्रतच मिळाली नसल्याने युक्तीवाद करण्यात अडचण येत असल्याचे शिंदे गटाने म्हटले होते. यावरुन विधानसभा अध्यक्षांनी कागदपत्रे देण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.
आमदार अपात्रतेच्या प्रकरणातील सुनावणसाठी आज शिंदे गटाचे 21 आमदार उपस्थित होते. तर ठाकरे गटाचे सर्व आमदार सुनावणीसाठी उपस्थित होते. या प्रकरणात एकूण 41 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिंदे गटाच्या वेतीने सर्व आमदारांवर स्वतंत्र्या याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे याचिकांची संख्या वाढली आहे. ही सर्व प्रकरणे वेगवेगळी नसून एकच असल्याचे ठाकरे गटाच्या वतीने वकिलांनी सांगितले. तसेच सर्व प्रकरणाची एकत्र सुनावणी घेण्याची विनंती केली. या सुनावणीअंती विधानसभा अध्यक्ष वेळकाढू पणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे.
सुनील प्रभूंच्या याचिकेवर दोन आठवड्यांनी सुनावणी, इतर प्रकरणे वेगळे- नार्वेकरांनी केले स्पष्ट
शिंदे गटाच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला की, सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेच्या प्रती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात. प्रभूंनी याचिका केली होती की, सगळ्या प्रकरणांची सुनावणी एकत्र घेतली जावी. अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना आदेश दिले आहेत की, त्यांनी त्यांचे कागदपत्र एकमेकांना द्यावेत. यानंतर पुढची तारीख दिली जाईल. त्यानंतर सुनावणी कशा पद्धतीने होईल, हे निश्चित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
इतर प्रकरणावर सुनावणी
दरम्यान, या पहिल्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना दोन आठवड्यांची मुदत दिली असली, तरी इतर याचिकांवर विधानभवनात सुनावणी करण्यात येत आहे. एकीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. तर दुसरीकडे दोन्ही गटांनी आपल्याच बाजूने निर्णय येईल, असा दावा केला आहे.
या सुनावणीला कसे सामोरे जायचे याचे नियोजन उद्धव ठाकरे गटाने केले आहे. त्यासाठी वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सर्व आमदारांचे उत्तर एकच असावे, यासाठी आमदारांकडूनही तयारी करुन घेण्यात आली आहे. शक्यता सर्व प्रश्नांची उत्तर वकीलांनीच द्यावे, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतील चाळीस आमदारांसोबत वेगळा निर्णय घेतला होता. त्या नंतर आधी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात दोन्ही गटात लढाई सुरू आहे. मात्र, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनीच घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. यासाठी अनेक दिवसांची प्रतिक्षा आता संपली असून आजपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत.
असीम सरोदे बाजू मांडणार
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या सर्व आमदारांनी वकील पत्र अध्यक्षांकडे सादर केले आहे. ज्यामध्ये दोन पानी लेखी उत्तराचाही समावेश करण्यात आला आहे. यात ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि वकील असीम सरोदे हे बाजू मांडणार आहेत.
आधी विधिमंडळात बैठक
आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या आधी ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची बैठक विधिमंडळात झाली. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या दालनात सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. येथे चर्चा झाल्यानंतर सर्व आमदार सुनावणीसाठी उपस्थित राहिले.
अपक्ष आमदारांनाही ठाकरे गटाच्या नोटिसा
शिवसेनेच्या ठाकरे गटातील 14 व शिंदे गटातील 40 आमदारांच्या अपात्रतेबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल केल्यामुळे त्यावर बाजू मांडण्यासाठी अध्यक्षांनी या सर्वांना एकाच दिवशी विधिमंडळात बोलावले आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला समर्थन देणारे व आता शिंदे गटासोबत गेलेले नरेंद्र बोंडेकर, बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकर या अपक्ष आमदारांनाही ठाकरे गटाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यांचीही अध्यक्षांकडून चौकशी होईल.
अपक्षही चौकशीस जाणार
आमदार यड्रावकर म्हणाले, आम्हाला घाबरवण्यासाठी नोटिसा दिल्या असाव्यात. हे चुकीचे आहे. मात्र आम्ही औपचारिकता म्हणून अध्यक्षांसमोर जाऊ. तर आ. बोंडेकर म्हणाले, पक्षांतरबंदीचा नियम अपक्षांना लागू होत नाहीच. कदाचित हे सुनील प्रभूंना माहीत नसावे. अध्यक्षांचा मान राखावा म्हणून आम्ही सुनावणीला जाऊ.