साखरपुडा केला, १० लाख वरदक्षणा घेवून लग्नच नाही; निलंगा पोलीस ठाण्यात मुलासह आई-वडिलांवर गुन्हा दाखल
निलंगा/ प्रतिनिधी: – निलंगा येथे राहत असलेल्या एका मुलीसोबत सोयरीक जमली, साखरपुडा झाला. वरदक्षणा म्हणून १० लाख रूपये घेतले. नंतर आम्हाला तुमच्या मुलीसोबत लग्नच करायचे नाही, आमच्या मुलाला दुसरी मुलगी पाहतोय, असे म्हणून वरदक्षणा परत न देऊन मुलीची व मुलीच्या वडिलाची फसवणूक केली म्हणून निलंगा पोलिसांत नियोजीत वर, त्याचे आई-वडील व मामा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, कोंडीराम बालु राठोड, गणेश कोंडीराम राठोड, सुशा कोंडीराम राठोड तिघेही रा. निमगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड व गोरख नामदेव चव्हाण रा. घुमटवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर यांनी निलंगा शहरात राहणाऱ्या एका ग्रामसेवकाच्या मुली संदर्भात सोयरीक केली, बोलणी झाली. या सोयरीकीत वधु पित्याकडून वर पित्यास ११ लाख रूपये वरदक्षणा देण्याचेही निश्चीत करण्यात आले. त्यानंतर रितसर साखरपुडा झाला. साखरपुडा होऊन एक वर्षभरापर्यंत प्रत्यक्ष लग्न करण्यास टाळाटाळ केली गेली. आम्हाला तुमची मुलगी पसंत नाही. आम्ही दुसरी मुलगी पाहतोय, असे म्हणत लग्नासाठी विलंब लावला. घेतलेला १० लाख ३१ हजार रूपये वरदक्षणाही परत केला नाही. यानंतर मुलीच्या वडिलाने नियोजीत वर गणेश कोंडीराम राठोड, वडील- आई व जवळचा नातेवाईक अशा चौघांविरूद्ध फिर्याद दिल्यानंतर निलंगा पोलिसांत चौघा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा निलंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.