निलंग्याच्या गणेश एखंडे यांनी पटकावला लोहपुरुष किताब
ट्रायथलॉन प्रकारातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वात खडतर व कठीण स्पर्धा रविवारी दिनांक 10 सप्टेंबर ला कोल्हापूर येथे पार पडली. या स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब च्या वतीने करण्यात आले होते.यात ब्रेक न घेता सलग 10 तासाच्या कट ऑफ टाईम मध्ये 2km पोहणे नंतर 90km सायकलिंग करणे व नंतर लगेचच 21km रनिंग करणे असे स्पर्धेचे अतिशय कठीण स्वरूप असते.या स्पर्धेत सहभागी झालेल्या एथलिट चा शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लागतो व किसही पडतो.राष्ट्रीय पातळीवरील ही स्पर्धा अतिशय जोखिमपूर्ण, खडतर व कठीण असते. 10 तासाच्या कट ऑफ टाईम मध्ये जो एथलिट ही स्पर्धा पूर्ण करतो त्याला लोहपुरुष (हाफ आयर्नमॅन) या किताबाने सन्मानित करण्यात येते. देश व विदेशातून जवळपास 1500 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.निलंग्याच्या 43 वर्षीय गणेश एखंडे यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी कसून सराव करावा लागतो. या स्पर्धेचा सराव म्हणून मागच्याच महिन्यात गणेश एखंडे यांनी निलंगा ते कन्याकुमारी सायकलवारीही केली होती.
अतिशय नियोजन बद्ध सराव व प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर 43 वर्षीय गणेश एखंडे यांनी ही स्पर्धा कुठलीही इजा न होऊ देता 9 तासात पूर्ण करून तालुक्यातील पहिला लोहपुरुष होण्याचा बहुमान मिळवला व निलंग्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
भारतात ट्रायथलॉन या प्रकारातील ही शेवटची स्पर्धा होते व यापुढील स्पर्धा विदेशात होतात असे गणेश एखंडे यांनी सांगितले.
गणेश एखंडे यांच्या या यशाबद्दल निलंगा हेल्थ अँड स्पोर्ट्स फाउंडेशन चे डॉ शेषेराव शिंदे, डॉ ज्ञानेश्वर कदम डॉ उद्धव जाधव, डॉ सचिन बसुदे, डॉ भीम खलंगरे, डॉ नितीश लंबे, डॉ सचिन जाधव, डॉ सुनील लंगोटे, डॉ श्रीहरी नलमले, हरिविजय सातपुते व सर्व सदस्यांनी गणेश एखंडे यांचा सत्कार केला. त्यांच्या या विस्मयकारक कामगिरीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.निलंगा शहरात हेल्थ विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून लवकरच निलंगा हेल्थ क्लब ची सुरुवात करणार असल्याचे गणेश एखंडे यांनी सांगितले.