कोलकाता : WB मधील TMCच्या खासदार नुसरत जहां यांची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरु आहे. कोलकातामधील कार्यालयात ईडीकडून नुसरत जहां यांची चौकशी केली जात आहे. सॉल्टलेकमधील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये ईडी अधिकारी नुसरत जहां यांची चौकशी करत आहेत. शहरातील न्यू टाऊनमध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याआधी 5 सप्टेंबर रोजी नुसरत जहां याच प्रकरणात ईडीसमोर हजर झाल्या होत्या. ईडीने नुसरत जहां यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठवलं होतं. नुसरत जहां या पश्चिम बंगालमधील बशीरहाटच्या खासदार आहेत.
नेमकं प्रकरण काय?
ईडीकडून सुरु असलेला तपास हा ज्येष्ठ नागरिकांच्या एका गटाने नुकत्याच दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित आहे, ज्यामध्ये रिअल इस्टेट कंपनीने न्यू टाऊन परिसरात फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. 2014-15 मध्ये 400 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एका कंपनीत पैसे जमा केले होते. यादरम्यान प्रत्येक व्यक्तीकडून 5.5 लाख रुपये घेण्यात आले आणि त्या बदल्यात त्यांना 1000 स्क्वेअर फूट फ्लॅट देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, तसं झालं नाही. ना कोणाला फ्लॅट मिळाला, ना पैसे परत मिळाले.’सेव्हन सेन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ नावाच्या कंपनीवर 23 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा नुसरत जहां यांच्यावर आरोप आहे. फसवणूक झाली तेव्हा नुसरत जहां या कंपनीच्या संचालक होत्या.
कंपनीशी कोणताही संबंध नाही, नुसरत जहां यांचा दावा
भाजप नेते शंकुदेव यांनी या संदर्भात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर ईडीने नुसरत जहां यांच्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अशा कोणत्याही कंपनीशी माझा संबंध नाही, असा दावा नुसरत जहां यांनी केला. तसंच या प्रकरणाच्या तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. तत्पूर्वी ईडी कार्यालयात दाखल होत असताना नुसरत जहां यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्याच्याकडून अनेक कागदपत्रे मागवली आहेत.
दुसऱ्या संचालकांनाही समन्स
दरम्यान, या प्रकरणात ईडीने सेव्हन सेन्सेस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कॉर्पोरेट संस्थेचे दुसरे संचालक राकेश सिंह यांनाही समन्स बजावलं आहे. त्यांना आज 12 सप्टेंबर रोजी कोलकातामधील सॉल्ट लेक इथल्या सीजीओ कॉम्प्लेक्स कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.