मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त झाली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या जागी या समितीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांना संधी देण्यात येणार का? त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. अजितदादांना अध्यक्ष करण्याची मागणी झाली आहे, त्यावर विचार करून निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाचे आंदोलन शांत व्हाने आणि मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, या वर विचारमंथन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील गैरहजर राहिले. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यात सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये नाराजी दिसून आली होती. शिवाय चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अध्यक्ष करा अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली होती.
चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणासाठी सकारात्मक नसल्याचा आरोप
या संबंधी माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पश्नही विचारले होते. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणासाठी सकारात्मक नसल्याचा आरोप केला होता. तसेच समितीचे अध्यक्ष पाटील नव्हे तर अजित पवार यांना करा, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यावर आपण विचार करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.