“महाराष्ट्रात माझ्याकडे कोणतीही जबाबदारी नाही. मी महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही गोष्टीत नाक खुपसत नाही,” असे विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतेच केले आहे. पंकजाताईंच्या मनात नेमकं काय सुरू आहे, अशी चर्चा सुरू असताना आज त्यांनी मोठे विधान केले.”खासदार प्रीतम मुंडेंच्या जागेवर मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे त्यांना लोकसभेसाठी भाजपने ऑफर दिली आहे का ? असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला आहे. “मी कुणालाही डायरेक्ट घरी बसवून असा निर्णय घेणार नाही. जगात कुठेही निवडणूक लढवेल, पण मी प्रीतमताईंना बाजूला करून निवडणूक लढवणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रीतमताईंची जागा मी घेणार नाही?
“पक्षाने ठरवले किंवा जगाने जरी मला सांगितले तरी खासदार प्रीतम मुंडेंच् डावलून त्यांच्या जागी निवडणूक लढवणार नाही. त्यांची जागा मी घेणार नाही. प्रीतम, तुला शून्यातून सिद्ध व्हायचंय आहे. तुला माझे आशीर्वाद आहेत. तू स्वतःला सिद्ध कर,” अशी भावनिक साद त्यांनी या वेळी घातली.
मला मोठ्या डब्यात बसू द्या…
“मला जग जिंकू द्या, मी बारीक गोष्टींचे आकलन करू शकत नाही. काहीतरी मोठे करण्यासाठीच माझा जन्म झाला आहे, समाजाला काहीतरी देण्यासाठी मला काम करायचंय आहे. लहान डब्यात मी बसत नाही, मला मोठ्या डब्यात बसू द्या. माझ्या भूमिकेत समाजाचे हित आहे, मग ते कोणाला आवडो नाही तर ना आवडो, माझी भूमिका स्पष्ट असते,” असे मुंडे म्हणाल्या.
लढले अन् जिंकले तर इतिहास
“माझं उत्तर मी शोधले आहे. लढले अन् जिंकले तर इतिहास होईल. निवडणुका जवळ आल्याने निधी मिळणार नाही, तेव्हा आशीर्वाद द्या,” अशी विनंती त्यांनी केली. “शिवशक्ती परिक्रमेत मला प्रचंड मोठी शक्ती मिळाली. पक्षाची शक्ती नसेल अशा ठिकाणीही माझे स्वागत झाले. पक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांनी अभूतपूर्व स्वागत केले. सत्व, तत्त्व आणि ममत्व हे जपले आहे. माझ्यासाठी वडिलांचे नाव हीच मोठी संपत्ती आहे. ही शिवशक्ती परिक्रमा मुंडे साहेबांना समर्पित करते,” असे सांगताना पंकजाताईंना अश्रू अनावर झाले परिक्रमेच्या समारोपप्रसंगी बीडच्या परळी येथील वैद्यनाथ प्रवचन हॉलमध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या. या वेळी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजप नेते उपस्थित होते. त्यांच्या या भावुक भाषणानंतर त्यांच्या मनात काय सुरू आहे, याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.