राज्यातील राजकारणाला कलाटणी ठरू शकते, अशा आमदार अपात्रतेबाबत सुनावणीची तारीख आणि वेळही निश्चित झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या विरोधात असलेल्या या याचिकवर सुनावणी आता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 14 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. इतकेच नाही तर एकाच दिवशी तब्बल 34 याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सर्व आमदारांची सुनावणी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीसा पाठवल्या होत्या. या दोन्ही गटाकडून उत्तर मिळाले असून यावरची सुनावणी आता होणार आहे. यात वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार असून त्या संबंधित आमदारांना बोलावले जाईल.
दोन्ही गटांना नोटीस
विधिमंडळात होणऱ्या या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे. या सुनावणीत दोन्ही गटाच्या आमदारांना सर्व पुरावे सादर करण्यासह अपात्रतेच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी युक्तीवादही करावा लागणार आहे.
राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाची उत्सुकता
शिवसेनतील बंडखोर आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी पार पडली होती. त्या नंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकले होते. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला होता. त्यामुळे आता अध्यक्षांचा निर्णय अंतिम मानला जाणार आहे. या प्रकरणी आता १४ सप्टेंबरला राहुल नार्वेकर हे सुनावणी घेणार आहेत. ते काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे.