मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 14 दिवस आहे. जालन्याच्या आंतरवाली सराटीत मनोज पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता अनेक गावांत पोहोचले असून, यामुळे सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
Live Update’s
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे बंदला पाठिंबा घोषित केला आहे. याशिवाय शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहराध्यक्ष प्रदीप शिंदे यांनीही याचे समर्थन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते रवींद्र मोरे व अविनाश जाधव यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.
- मराठा आरक्षणाप्रकरणी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेतृत्व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार आहे. काँग्रेस या बैठकीला जाणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
- निवडणुकीपू्र्वी महाराष्ट्रासह देशभरात जातीय दंगली घडवण्याचे कट कारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर केला आहे.
- मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र तापला असताना मुख्यमंत्री शिंदे केवळ तीर्थयात्रेतच गुरफटून पडल्याची टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्लीत होते. आज तीर्थ यात्रेवर आहेत. तंत्रमंत्र व जादूटोणा यातच त्यांचा वेळ चालला आहे, असे ते म्हणाले.
- शिवसेनेच्या आमदारांवरील अपात्रतेच्या मुद्यावर येत्या 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांच्या आमदारांची एकाच दिवशी सुनावणी होईल, अशी माहिती आहे.
- मराठा आरक्षणासाठी गत 14 दिवसांपासून जालन्याच्या आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय पक्षांना एक सूचक इशारा अन् संदेश दिला आहे. आमच्याविरोधात बोलणाऱ्यांना आम्ही सोडत नाही. आपला दणकाच असा आहे. सत्तेत असणाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा, असे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला संदेश अन् इशारा देत म्हटले आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
- सकल मराठा समाजाने सोमवारी ठाणे बंदची हाक दिली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे स्थित निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. या बंदला संभाजी ब्रिगेडनेही पाठिंबा दिला आहे.
- साताऱ्याच्या पुसेसावळी गावात 2 गटांत दगडफके झाली आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन हा वाद झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
- 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे आज शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. देशभरातून आलेल्या भक्तांची पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.