तुम्ही जर नैतिकतेच्या गोष्टी करता तर मग आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर मीडियापुढे का आला नाहीत? आतापर्यंत एकदाही पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट का केली नाही? याचाच अर्थ तुम्ही केलेले कृत्य मान्य करताय, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्यांच्या नोटिसीला दिलेल्या उत्तरात केले आहे.किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला. त्यानंतर सोमय्या यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली. याचदरम्यान अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात सोमय्या यांच्या व्हिडिओचा मुद्दा उचलून धरला. सोमय्यांनी अनेक महिलांशी संपर्क केला, असा दावा करीत दानवे यांनी सभागृहात पेनड्राईव्ह सादर केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
22 पानी उत्तर
याबाबत सोमय्या यांनी स्वतःची बदनामी झाल्याचे म्हणत अंबादास दानवे यांना 18 पानी नोटीस पाठवली होती. त्या नोटिसीला प्रत्युत्तर म्हणून दानवे यांनी ऍड. शुभम काहिटे यांच्यामार्फत सोमय्या यांना 22 पानी कायदेशीर उत्तर दिले आहे.
पदाचा गैरवापर करत आवाज दाबला
अंबादास दानवे म्हणाले की, तुम्ही जर स्वच्छ चारित्र्याचे असाल व नैतिकतेच्या गोष्टी करीत असाल तर मग आतापर्यंत एकही पत्रकार परिषद का घेतली नाही? मीडियापुढे कथित व्हिडिओप्रकरणी स्वतःची भूमिका स्पष्ट का केली नाही? कथित व्हिडिओप्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असताना तुमच्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना नोटिसा पाठवताय. हा कथित व्हिडिओवरून तपास यंत्रणा तसेच लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. तसेच जर एकही महिला तक्रार करण्यासाठी पुढे येणार नाही असे आत्मविश्वासाने सांगत असाल तर तुम्ही पदाचा दुरुपयोग करून पीडित महिलांचा आवाज दाबला असणार, असा आरोप दानवेंनी केला आहे.