• Sat. May 10th, 2025

फडणवीसांनी दिला बंद लिफाफा; भाजपचे ७ खासदार, ३० आमदार गॅसवर; कामाला लागण्याच्या सूचना

Byjantaadmin

Sep 10, 2023

मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादीतील फाटाफूट, स्थिरस्थावर होत असलेलं शिंदे-फडणवीस-पवार सरकार या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपनं अंतर्गत सर्वेक्षण करत त्याआधारे एक अहवाल तयार केला आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक खासदार आणि आमदारांची चिंता वाढली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीआधी भाजप असे दोन-तीन सर्व्हे करणार आहे. खराब कामगिरी करणाऱ्या आमदार-खासदारांनी सुधारणा न केल्यास त्यांचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता आहे.

devendra dcm

 

भाजपच्या बैठकीत काय घडलं?
शुक्रवारी गरवारे क्लबमध्ये भाजप विधानसभेचे आमदार, विधानपरिषदेचे खासदार, लोकसभेचे खासदार, राज्यसभेचे खासदार यांची विभागवार बैठक झाली. सकाळी सुरू झालेलं बैठकांचं सत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. बैठकीला राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी सर्व आमदार, खासदारांना एक बंद लिफाफा देण्यात आला. तो सर्वांना उघडण्यास सांगण्यात आला. या लिफाफ्यात खासदार, आमदारांची त्यांच्या मतदारसंघातील लोकप्रियता, सोशल मीडियावरील त्यांची सक्रियता, त्यांनी केलेली विकासकामं, प्रचार यासारख्या मुद्द्यांची माहिती होती.
खासदार, आमदारांना नेमक्या काय सूचना?
सर्वेक्षणात ५० पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या आमदार, खासदारांना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर ५० पेक्षा अधिक गुण असलेल्या लोकप्रतिनिधींना अधिक सक्रिय होण्यास सांगण्यात आलं. तर ६० हून अधिक गुण मिळवणाऱ्या खासदार, आमदारांना त्यांची कामगिरी आहे तशीच कायम राखण्याचा सल्ला देण्यात आला. काही आमदार, खासदारांची शिवप्रकाश आणि फडणवीसांना चांगलीच कानउघाडणी केल्याचं समजतं. नवभारत टाईम्सनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.किती आमदार, खासदारांची कामगिरी खराब?
राज्यात भाजपचे एकूण २३ लोकसभा खासदार आहेत. त्यातील ५ ते ७ खासदारांची कामगिरी वाईट आहे. मतदार आणि स्थानिक पदाधिकारी खासदारांच्या कामगिरीवर नाराज आहेत. तर विधानसभेच्या १०५ आमदारांपैकी २५ ते ३० जणांच्या कामगिरीवर मतदार नाराज आहेत. त्यांना अधिक सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *