• Sat. May 10th, 2025

गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, पालकमंत्री देखील निवडले जाणार

Byjantaadmin

Sep 10, 2023

गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पालकमंत्री देखील निवडले जातील. राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळेल,असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.दरम्यान खासदार सुनील तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो आहोत, पण आम्ही देखील पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. पक्षवाढीसाठी आमचा देखील खारीचा वाटा आहे. अजित पवार गटाची उत्तर सभा आज कोल्हापुरात होत आहे. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार आणि जाहीर सभा होणार आहे. या सभेला अजित पवार गटाचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सभेसाठी कोल्हापुरात आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

 

प्रतिसाद बघून आमच्यावर टीका

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, 2004 ला राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री झाला असता, पण का संधी गमावली माहित नाही, ज्यांचे जास्त आमदार असतील तो मुख्यमंत्री होईल, आम्हाला मुख्यमंत्रीपदाची घाई नाही. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे सर्वांनाच वाटते असे त्यांनी म्हटले आहे. हे सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशील आहे. मला दोन्ही विरोधी पक्षनेत्यांची कीव येते. काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु आहे. उद्धव ठाकरे सुद्धा सभा घेत आहेत. अजित पवार यांना मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्याकडून आमच्यावर टीका होत आहे.

सुनील तटकरे म्हणाले की, तपोवन मैदानात सभा घेण्याचा धाडस हसन मुश्रीफ करु शकतात. उत्तर देण्यासाठी ही सभा नाही.अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर आता लढाई निवडणूक आयोगात पोहोचली आहे. दोन्ही गटाकडून म्हणणे सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे.” जयंत पाटील यांनी आधीच विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईचे पत्र दिले आहे. या संदर्भात पुढील प्रक्रिया सुरु आहे.

म्हणून बॅनरवर पवारांचा फोटो नाही

सुनील तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये सामील होताना शिवसेनेबरोबर गेलो. मग आता विचारसरणी बदलली असं होत नाही. आम्ही आमचा विचार बदलला नाही. आमच्या विचाराने आम्ही पुढे चाललो आहोत. शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण त्यांनी आमच्यासोबत सामील होण्याबाबत आजही अपेक्षा आहे. साहेबांना त्रास होऊ नये म्हणून बॅनरवर फोटो लावलेले नाहीत. ईडीला घाबरुन आम्ही गेलो हा शरद पवार यांचा आरोप चुकीचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *