नागपूर : नागपूर विधिमंडळ परिसराचे विस्तारीकरण करण्याबाबत प्रयत्नशील असून याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देशित करण्यात आले आहे. तसेच अधिवेशन काळात मर्यादित प्रवेश व सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन संसदेप्रमाणे मध्यवर्ती ‘बारकोड ‘ पद्धतीचा अवलंब करणार असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे दिली.
नागपूरमध्ये होऊ घातलेल्या डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसंदर्भात आज नागपूर विधिमंडळ परिसरात मंत्रीपरिषद सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला.
या बैठकीला विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी,जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते, यांच्यासह विधिमंडळाच्या आयोजनातील विविध आवश्यक विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. तर मुंबई येथून विधानसभा अध्यक्ष यांचे सचिव म.मू.काज, विधान मंडळाचे उपसचिव राजेश तारवी,अव्वर सचिव रवींद्र जगदळे, सुनील झोरे, विधानभवनाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, अध्यक्षांचे विशेष कार्य अधिकारी डॉ.अनिल महाजन, संगणक प्रणालीचे प्रमुख अजय सरवणकर, ग्रंथपाल निलेश वडनेरकर आदी उपस्थित होते.
श्री.नार्वेकर यांनी गेल्या दोन वर्षानंतर हे अधिवेशन होत असल्यामुळे नागपुरातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील आढावा सर्वप्रथम घेतला. नागपूरचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील माहिती दिली. नागपुरातील विधिमंडळाचा संपूर्ण परिसर तसेच लोकप्रतिनिधींच्या वास्तव्याची सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीत असतील. मोर्चे, त्यांचे नियंत्रण ,भेटीचे ठिकाण, शिष्टमंडळाच्या भेटी याबाबतही त्यांनी माहिती दिली. महिला आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात कडेकोट बंदोबस्त आमदार निवासात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी अधिवेशनासाठी दहा हजारावर पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असतील.
अधिवेशन परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मोजक्या व सुरक्षित प्रवेशाची संसदेच्या धरतीवरील मध्यवर्ती बारकोड पद्धत अवलंब व्हावी,प्रवेशिका स्कॅन करून प्रवेश व्हावा, अशी सूचना श्री. नार्वेकर यांनी केली.