इंडिया आघाडी विरुद्ध भाजपप्रणित एनडीए यांच्यातील पहिली राजकीय लढाई अशी चर्चा झालेल्या उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीनं बाजी मारली आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले सपाचे सुधाकर सिंह (Sudhakar Singh) यांनी एनडीएचे दारा सिंह चौहान (Dara Singh Chauhan) यांचा तब्बल ४३ हजारांहून अधिक मतांनी दारुण पराभव केला आहे.देशाच्या सहा राज्यांतील सात जागांसाठी ५ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक झाली होती. त्यात घोसी विधानसभेचाही समावेश होता. इथं समाजवादी पक्षानं सुधाकर सिंह यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपनं दारा सिंह चौहान यांना उतरवलं होतं. इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी समाजवादी पक्षाच्या सुधाकर सिंह यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळं ही निवडणूक इंडिया आघाडीची पहिली परीक्षा मानली जात होती. ही परीक्षा इंडिया आघाडीनं प्रचंड मताधिक्य मिळवून उत्तीर्ण केली आहे.इंडिया आघाडीच्या सुधाकर सिंह यांनी पहिल्या फेरीपासून दारा सिंह चौहान यांच्यावर आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीगणिक त्यांची ही आघाडी वाढत गेली आणि दारा सिंह चौहान मागे पडत गेले. अखेर त्यांचा पराभव झाला. हा पराभव भाजपसोबतच त्यांचे मित्र ओपी राजभर, अपना दल, निषाद पार्टीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
समाजवादी पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन दारासिंह चौहान यांनी जुलै महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळं ही पोटनिवडणूक झाली. भाजपनं पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. याआधीच्या निवडणुकीत चौहान यांनी भाजपच्या उमेदवाराचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळं भाजपला त्यांच्या विजयाचा विश्वास होता. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही चौहान यांच्यासाठी जोर लावला होता, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपचं निर्विवाद बहुमत असल्यानं या पोटनिवडणुकीच्या निकालाचा राज्यातील सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, इंडिया आघाडीचा हा पहिला विजय अनेकार्थांनी सूचक मानला जात आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. इंडिया आघाडीनं भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार दिल्यास चित्र वेगळं असू शकतं, असं बोललं जात आहे.