मुंबईत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरीची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीने पोलिस ठाण्यातील लॉकमध्ये पँटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, विक्रम अटवाल असे मृत आरोपीचे नाव आहे. त्याने लॉकअपमध्ये हाफ पँटच्या मदतीने गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6.30 च्या सुमारास उजेडात आली. त्याच्यावर पवईत राहणाऱ्या रुपल आग्रे नामक एअर होस्टेसची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी ठोठावली होती. तेव्हापासून अंधेरी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये होता.
कोण होती रुपल आग्रे?
मुंबईच्या पवई भागातील मरोळ येथील अपार्टमेंटमध्ये 4 दिवसांपूर्वी रुपल आग्रे नामक हवाई सुंदरीची हत्या करण्यात आली. रुपल आग्रे मूळची छत्तीसगडच्या रायपूरची होती. सध्या ती मुंबईच्या पवाई भाघातील मरोळ स्थित एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती.
रुपल एकटीच होती घरात
रुपल आग्रे हिच्यासोबत तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्सही राहत होते. कुणीतरी तिची अत्यंत निर्घृणपणे गळा चिरून हत्या केली. यासंबंधीच्या माहितीनुसार, हत्या झाली त्या दिवशी रुपल घरात एकटीच होती. तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्स गावी गेल्यामुळे तिच्यासोबत घरी कुणीच नव्हते.
कुटुंबीय करत होते फोन कॉल
तिच्या कुटुंबीयांनी तिला अनेकदा कॉल केला. पण ती त्यांच्या फोनला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे काळजीपोटी त्यांनी तिच्या एका मैत्रिणीला फोन करून तिची माहिती काढण्यास सांगितले. त्यानंतर तिची मैत्रीण तिच्या घरी पोहोचली. तिने बराच वेळ दार ठोठावून पाहिल्यानंतरही तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.