सद्यस्थितीत दोन्ही भाऊ वेगवेगळ्या रो हाऊसमध्ये राहतात. त्यांच्यात केवळ कंपाऊंड आहे, अशा सूचक शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवर भाष्य केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत परतणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो
सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांना राष्ट्रवादीतील बंडखोरीवर विशेषतः अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतणार का? असा थेट प्रश्न करण्यात आला. त्यावर त्या प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला तुमच्या तोंडात साखर पडो असे उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो. आता दोन भाऊ वेगवेगळ्या रो हाऊसमध्ये राहतात. त्यांच्यात केवळ कंपाऊंड आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ही वैचारिक लढाई आहे. निवडणुकीच्या वेळी तिचे राजकीय लढाईत रुपांतर होईल. राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही. आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत.
लाठीचार्जला फडणवीस जबाबदार
सुप्रिया सुळे यांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्यांचाही निषेध केला. तसेच या घटनेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत, असा दावाही केला. सरकारने दुष्काळ व मराठा आंदोलनावर विरोधी पक्षांशी संवाद साधला पाहिजे. पण ते विरोधकांच्या मागे तपास यंत्रणा लावण्यात व पक्ष फोडण्यातच व्यस्त आहेत, असे त्या म्हणाल्या.
सत्ताधारी विरोधकांशी चर्चा करण्यास घाबरतात
राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे. पण सरकारने चारा छावण्या सुरू करण्याची अद्याप कोणतीही तयारी केली नाही, असे त्या म्हणाल्या. पूर्वी मंत्रिमंडळाची दर आठवड्याला बैठक होत होती. पण आता ही बैठक 15 दिवसांनी होते. सत्ताधारी विरोधकांशी चर्चा करण्यास घाबरतात. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणीस यांनी आमच्या घरापुढे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे सरकार आल्यानंतर आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. पण आता राज्यात व केंद्रात त्यांची भूमिका वेगळी दिसते, असेही सुप्रिया सुळे यावेळी फडणीस यांना टोला हाणताना म्हणाल्या.