शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देत सहप्रकल्प सुरू करणार-आ.संभाजी पाटील निलंगेकर डॉ. निलंगेकर कारखान्याच्या रोलर पुजन प्रसंगी ग्वाही
निलंगा/प्रतिनिधी:- मतदारसंघासह जिल्ह्यातील शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्याकरीता कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा चालू करण्याचा निर्णय घेतला.ओंकार शुगरच्या माध्यमातून कारखाना गतवर्षी अत्यंत कमी वेळेत सुरु झालेला आहे.यावर्षी कारखाना वेळेत सुरु होऊन पाच लाखापेक्षा अधिकचे ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देत नोव्हेंबर पर्यंत सहप्रकल्प सुरू करणार असल्याचा विश्वास माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला. निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज ओंकार शुगर्सच्या दुसर्या गळीत हंगामानिमित्त माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते रोलर पुजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. निलंगेकर बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, निलंगा विधानसभा प्रमुख दगडु साळूंके, माजी जि.प. अध्यक्ष मिलिंद लातूरे, ज्येष्ठ विधिज्ञ सी.जे. सबनीस, निलंगा बाजार समिती सभापती शिवकुमार चिंचनसुरे, औराद बाजार समितीचे सभापती नरसिंग बिराजदार, जि.प.चे माजी सभापती संजय दोरवे, संतोष वाघमारे, शिरुर अनंतपाळ तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, देवणी तालुका अध्यक्ष काशिनाथ गरिबे, उपसभापती लालासाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील साखर कारखानदारीमध्ये असलेली आपली मक्तेदारी मोडीत निघेल या भीतीने अनेकांनी कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना सुरु होऊ नये याकरीता अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून या सर्व अडचणीवर मात करत केवळ शेतकर्यांच्या हितासाठी हा कारखाना ओंकार शुगरच्या माध्यमातून सुरु करण्यात आल्याचे माजी मंत्री आ. निलंगेकरांनी सांगितले. कारखाना चालवत असताना यामध्ये कोणतेही राजकारण आणले जाणार नाही असे आपण सातत्याने सांगितले असून या कारखान्याच्या माध्यमातून केवळ आणि केवळ शेतकर्यांचेच हित जोपसले जाणार असल्याचे पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच हा कारखाना शेतकर्यांच्या विकासाचे मंदीर ठरावे या दृष्टीने कारखान्यात अनेक सहप्रकल्प सुरु करण्यात येत आहेत. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले असून या प्रकल्पातून डिस्टलरी, सीएनजी, इथेनॉल व खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले. हे प्रकल्प नोव्हेंबर महिन्यात सुरु होतील असा विश्वास देऊन या प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय मंत्र्याच्या उपस्थितीत होईल अशी घोषणाही माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी केली.
कारखान्यात सुरु होणार्या सहप्रकल्पामुळे शेतकर्यांच्या ऊसाला अधिकाधिक भाव मिळण्यास मोठी मदत होईल असे सांगून यावर्षी पाच लाख मे.टनापेक्षा अधिकचा ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट चेअरमन बोत्रे पाटील यांनी ठेवले असल्याचे माजीमंत्री आ. निलंगेकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे गतवर्षी 2562 रूपयांचा भाव घोषीत करून शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावर्षी अधिकाधिक दर आपला कारखाना देईल अशी ग्वाही देऊन कारखाना अधिक यशस्वीपणे चालविण्यासाठी शेतकर्यांनी कारखाना प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी केले.याप्रसंगी चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर व माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी कारखाना अत्यंत कमी वेळात चालू केला असल्याचे सांगून याकरीता कारखान्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी मोठी मदत केली असल्याचेही सांगितले. कारखाना हा केवळ शेतकर्यांच्या हितासाठीच चालवावा अशी सुचना सातत्याने माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या वतीने होत असते त्याचबरोबर माजी मंत्री आ. निलंगेकरही कारखाना चालवित असताना कोणताही राजकीय स्पर्श होऊ देत नाहीत याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले. यावर्षी कारखाना जिल्ह्यात अधिकाधिक दर देईल असा विश्वास देऊन ऊस उत्पादक शेतकर्यांनी वेळेत आपल्या ऊसाचे गाळप होण्यासाठी ऊसाची नोंदणी करावी असे आवाहन करून कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही अशी ग्वाही चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी कारखाना परिसरात उभारण्यात येत असलेल्या सहप्रकल्पाची पाहणी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी केली. या सहप्रकल्पाबाबत विस्तृत माहिती चेअरमन बोत्रे पाटील यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन शेषेराव ममाळे यांनी केले. या कार्यक्रमास निलंगा विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.