विविध मागण्यांसाठी बॅरेजेस कामगारांचे बेमुदत उपोषण
लातूर / जिल्ह्यातील निलंगा उपविभाग व मांजरा बॅरेजेसवरील कामावरून कमी केलेल्या अनुभवी कामगारांना तात्काळ कामावर घ्या यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते व पाटबंधारे कर्मचारी संघटनेच्या लातूर शाखेच्या वतीने राज्य राज्यसचिव कॉ. राजेंद्र विहिरे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभाग अधीक्षक अभियंता लातूर कार्यालयासमोर बुधवार 6 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले असून मागण्या लवकर मान्य न झाल्यास जिल्ह्यातील मांजरा, तेरणा नदीवरील असलेल्या सर्व बॅरेजेसवरील कामगार काम बंद करून कुटुंबियांसह आंदोलनात सहभागी होतील असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मंत्री संजय बनसोडे, औशाचे आ.अभिमन्यू पवार, सहा. कामगार आयुक्त यांनी सूचना करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते व पाटबंधारे विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या या उपोषणकर्त्यांकडून बोगस ठेकेदार टेंडर रद्द करून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची चौकशी करा, शासन निर्णयाप्रमाणे बॅरेजेस कामगारांचा हुद्दा, रोजंदारी दर, कामाचे तास, सुरक्षा निवारा, गणवेश आदी, जेष्ठता डावलून कामावरून कमी केलेल्या कामगारांना परत कामावर घ्या, त्यांचा पगार द्या,मागील आठ महिन्यांपासून कामगारांचे रोखलेला पगार किमान वेतनाप्रमाणे द्यावा आदी मागण्यासाठी बॅरेजेस कामगारांनी संघटनेच्या लातूर शाखेच्यावतीने बेमुदत उपोषण सुरु केले असून मागणी मान्य न झाल्यास जिल्ह्यातील सर्व बॅरेजेस कामगार काम बंद करून कुटुंबियांसह आंदोलनात सहभागी होतील असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत गोदावरी महामंडळाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक औरंगाबाद, कार्यकारी अभियंते पाटील, अधीक्षक अभियंते तथा प्रशासक लातूर विभागाचे चिस्ती यांना कामगारांचे सदर प्रश्न सोडविण्याबाबत वारंवार निर्देश देण्यात येऊनही असंवेदनशील प्रशासनाने कामगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आंदोलकानी नाराजी व्यक्त करत भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात पीडित कामगारांसह संघटनेचे राज्यसचिव कॉ. राजेंद्र विहिरे, जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे, उपाध्यक्ष बालाजी बिराजदार, सचिव रजनीकांत कदम, कोषाध्यक्ष विनोद मोगरगे, सदस्य गणेश सोनटक्के आदींचा सहभाग आहे.
मंत्री संजय बनसोडे, आ. अभिमन्यू पवार यांच्या सूचनास केराची टोपली
– लातूर जिल्ह्यातील एकूण 28 बॅरेजेस वरील 54 कामगारांपैकी कामावरून कमी केलेल्या 15 अनुभवी कामगारांना तात्काळ कामावर घ्या त्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा अशा सूचना राज्याचे युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी जलसंपदा विभागाचे प्रशासक तथा लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूरचे अधीक्षक अभियंत्यास निर्देश दिले होते परंतु या सूचनास केराची टोपली दाखवण्यात आल्याने आपल्या न्याय हक्कासाठी कामगार लोकशाही मार्गाने उपोषणास बसले आहेत.