मुंबई, 4 सप्टेंबर : जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लोकांवर लाठीचार्ज केल्याच्या घटनेचे पडसाद आता राज्यभर पसरू लागले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे मराठा मोर्चा आणि इतर संघटनांशी संबंधित लोकांमध्ये संताप आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
ज्या निष्पाप लोकांवर लाठीचार्ज झाला, त्याबद्दल क्षमा मागतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. या पूर्वी देखील मी गृहमंत्री होता, वेगळ्या विषयावर 2 हजार आंदोलनं झाली. कधीही आम्ही बळाचा उपयोग केला नाही, आताही बळाचा वापर करायची गरज नव्हती. ज्या निष्पाप लोकांवर लाठीचार्ज झाला, जे जखमी झाले, त्यांना इजा झाली, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची संपूर्ण उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी बोलताना दिले.
फक्त राजकारण करण्याचे कारण नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जाणीवपूर्वक मंत्रालयातून आदेश आले, असा आरोप केला गेला आहे. राजकीय नेत्याकडून विनाकारण असे आरोप झाले. त्यांना चांगलं माहिती आहे, एसपी याबद्दल निर्णय देत असतात. तर माझा प्रश्न असा आहे की, ज्यावेळी निष्पाप 113 गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले, त्यावेळी कुणी आदेश दिला होता. तो मंत्रालयातून आदेश आला होता. किंवा मावळमध्ये गोळीबार झाला होता, त्यामध्ये शेतकरी दुर्दैवी मृत्यूमुखी पडले, त्यावेळी मंत्रालयातून आदेश दिले होते का? त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनी आदेश दिले होते का? त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता का, जर दिला नसेल तर का दिला नाही. मुळात घटना दुर्दैवी आहे, पण सरकारनेच हे केलं आहे असं दाखवलं जात आहे. लोकांना चांगलं माहिती आहे. राजकारण केलं जात आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.