जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. त्यातच राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेत तोडगा निघाला नसल्याने आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या संदर्भात मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आजच घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जालना इथल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याच्या संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहे. या बैठकीला मनोज जरांगे यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.
अकरा जणांची समिती आजच अहवाल देणार
मराठा आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अकरा जणांची समिती गठीत करण्यात आली होती. मराठा समाजाच्या महसुली आणि शैक्षणिक नोंदी, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे, मराठा समाजातील लोकांची वंशावळ यावर समितीने अभ्यास केला आहे. ही समिती आजच आपला अहवाल सरकारला सादर करेल आणि त्या आधारे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.