जालना शहरातील अंबड चौफुली येथे रास्तारोको आंदोलनादरम्यान दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या दीड ते दोन हजार जणांवर तालुका जालना पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.दोन) रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शनिवारी जालना बंदची हाक देण्यात आली होती.
शिवाय अंबड चौफुली येथे रास्तारोको आंदोलनही करण्यात आले होते. शनिवारी सकाळीच अंबड चौफुली येथील रास्तारोको आंदोलनासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले होते.मात्र, हा जमाव अनियंत्रित झाल्याने त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. शिवाय एक ट्रक, कार आणि एक भंगाराचे दुकान जाळलेअनेक खाजगी वाहनांची तोडफोड केली.
या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा पोलिस कर्मचारी सुनील गांगे यांच्या फिर्यादीवरून आंदोलनाचे आयोजन करणारे अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडुळ, विश्वरभर तिरुखे, देवकर्ण वाघ, राधाकिसन शिंदे, संदीप लांडगे यांच्यासह दीड ते दोन हजार जणांवर तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल.. करण्यात आले आहेत.दरम्यान, आम्ही शांतते अंबड चौक येथे आंदोलन करत होतो. या रस्तारोको आंदोलनासंदर्भात तीन दिवसांपासून माहिती सोशल मीडियावर दिली जात होती. कायदा हातात न घेण्याचे अवाहनही आम्ही केले होते. दोन तास आंदोलन केल्यानंतर तहसीलदार यांना महिलांच्या हस्ते निवेदन दिले.त्यांना गाडीमध्ये सुरक्षा बनवून पाठवले. तेथेचे आम्ही आंदोलन समाप्त झाल्याचे जाहीर केले होते. आम्ही तिथून निघून गेल्यानंतर हेतूपुरस्पर काही लोकांनी आंदोलनाला गालबोट लावले. याचे खापर पोलिसांनी आमच्यावर फोडत गुन्हे दाखल केल्याचा आरोप मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी केला.