• Wed. Apr 30th, 2025

मराठा आरक्षणप्रश्नी आपण समाजासोबतच- आ.संभाजी पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Sep 3, 2023

 

मराठा आरक्षणप्रश्नी आपण समाजासोबतच-– आ.संभाजी पाटील निलंगेकर

आरक्षणासाठी शांततामय आंदोलनातून दबाव निर्माण करावा

राजकीय स्वार्थातून आंदोलनाला गालबोट

   निलंगा/प्रतिनिधी: मराठा समाजाला आरक्षण मिळवून घेण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन उभारून शासनावर दबाव निर्माण करावा, हीच आपल्या आंदोलनाची ओळख आहे..राजकीय स्वार्थासाठी कांही मंडळींकडून आंदोलनाला गालबोट लावले जात आहे. समाज हा डाव नक्की यशस्वी होऊ देणार नाही. आरक्षणप्रश्नी आपण समाजाच्या सोबतच आहोत असे प्रतिपादन आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

    निलंगा तालुक्‍यातील अंबुलगा येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना,लीज ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या रोलर पूजनासाठी आ.निलंगेकर कारखानास्थळी आले होते.यावेळी मराठा सेवा संघ,संकल्प फाउंडेशन व राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरक्षण प्रश्नी त्यांना घेराव घालुन निवेदन देण्‍यात आले. यावेळी बोलताना आ. निलंगेकर म्हणाले की, आरक्षणप्रश्नी आपण समाजाच्या सोबतच आहोत. आरक्षण उपसमितीचा सदस्य असताना आपण हा प्रश्न लावून धरला होता.मराठा समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे परंतु या व्यवसायात अनेक अडचणी आहेत.शिवाय समाजात बेरोजगारीचे प्रमाण अधिक असल्याने असमतोल निर्माण झाला असून त्यामुळे आरक्षण अत्यंत गरजेचे असल्याची शिफारस आपण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती.या दोघांच्या शिफारशीवरून आरक्षण लागूही करण्यात आले होते.परंतु नंतर ते कायदेशीर प्रक्रियेत अडकले.असे असले तरी अजूनही आपण आरक्षणाच्या बाजूने आहोत.याप्रश्नी जेंव्हा आंदोलन करण्याची वेळ येईल तेंव्हा आपण सर्वात पुढे असू,असे त्यांनी सांगितले.

   कांही मंडळी राजकीय स्वार्थासाठी आंदोलनाला गालबोट लावत आहेत.या मंडळींनी दाखवलेल्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहनही आ. निलंगेकर यांनी केले. मागील काळात आरक्षणासाठी समाजाकडून शांततेच्या मार्गाने विराट मोर्चे काढण्यात आले होते. आतादेखील अशाच शांततामय मार्गाने आंदोलन करण्याची गरज आहे.या माध्यमातून शासनावर दबाव निर्माण करावा.आरक्षणासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू,असे आश्वासनही आ. निलंगेकर यांनी यावेळी बोलताना दिले.

    यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष एम एम जाधव,राजे प्रतिष्ठानचे विनोद सोनवणे,संकल्प फाउंडेशनचे अजित उसनाळे,सिद्धेश्वर माने, महेश ढगे,अजित जाधव, नयन माने,अमोल माने, विकास माने,संतोष सुगावे,अमोल बिराजदार, राजू शिंदे,समाधान माने यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed