• Wed. Apr 30th, 2025

सरपंचाने जाळली स्वत:ची कार:’एक मराठा, लाख मराठा’च्या दिल्या घोषणा, गृहमंत्री फडणवीसांचा केला निषेध

Byjantaadmin

Sep 2, 2023

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचे संतप्त पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उठत आहे. लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये तर एका सरपंचाने स्वत:ची कारच पेटवून दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वर्षभरापूर्वीच घेतली होती गाडी

सरपंच मंगेश साबळे यांनी लाठीहल्लाप्रकरणी राज्य सरकारचा निषेध करत स्वत:ची गाडी पेटवून दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश साबळे यांनी वर्षभरापूर्वीच ही चारचाकी घेतली होती. मात्र, काल झालेल्या मराठा आंदोकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध करत करत त्यांनी फुलंब्री येथील पाल फाटा येथे आज आपले वाहन जाळले. यावेळी मंगेश साबळे यांच्यासोबत काही मराठा आंदोलकही होते.

…तर स्वत:ला जाळून घेऊ

माध्यमांना प्रतिक्रीया देताना मंगेश साबळे म्हणाले, आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही स्वत:ची गाडी जाळली, पुढे आम्ही स्वत:ला जाळून घेऊन निषेध व्यक्त करु. सरकारने दोन दिवसांत ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही स्वतला जाळून घेऊ.

फडणवीसांचा केला निषेध

जालन्यात झालेल्या लाठीहल्लाप्रकरणी मंगेश साबळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही निषेध केला. फडणवीसांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी त्यांनी केळी. मंगेश साबळे म्हणाले, जालन्यात न्याय हक्कांसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. मात्र, जेथे आपल्या लोकांवर काठ्या पडत असेल, आमच्या आई-बहिणींच्या डोक्यातून रक्त निघत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको

छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी सकाळी 9.30 वाजेपासून सिडको बसस्थानक चौकात मराठा समाजाकडून रस्ता रोको करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचा सर्व स्तरातून विविध मार्गाने निषध व्यक्त केला जाता आहे. राज्य सरकार व पोलिस प्रशासनाच्या हुकुमशाही धोरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed