जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यभरात संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत. याच आंदोलकांना धीर देण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे आज सकाळीच जालन्याला जाणार आहेत. तेथील आंदोलनकर्त्यांना धीर देऊन त्यांचं म्हणणं दोन्ही राजे ऐकून घेतील. कुणाच्या आदेशाने हे सगळं घडलं? असा सवाल उपस्थित करत छत्रपती संभाजीराजेंनी सरकारला घेरलं आहे. तर लाठीचार्ज प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे.
संभाजीराजे काय म्हणाले?
आंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा देतानाच मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणुकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, अशी आठवणही संभाजीराजेंनी सरकारला करून दिलीये.
उदयनराजे काय म्हणाले?
शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी कारण नसताना लाठीचार्ज केला. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जा घटनेत जे जे दोषी असतील त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी. मराठा मोर्चांनी आतापर्यंत फक्त राज्यात-देशात नाही तर जगात आदर्श निर्माण केला. मराठा मोर्चात आतापर्यंत एकदाही हिंसाचार पाहायला मिळाला नव्हता. पण आज पोलिसांनी जो अमानुष लाठीचार्ज केलेला आहे, त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजाच्या लोकांवर असा हल्ला होणं हे निषेधार्ह आहे, सरकारने संबंधिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी उदयनराजेंनी केलीये.
सरकारने तातडीने बैठक बोलावून लक्ष घालावे. मराठा समाजाची मागणी रास्त आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत चांगला निर्णय घेतला होता. मात्र तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही. तरी सुद्धा मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेने पुनर्विचार केला पाहिजे, अशी संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे. त्यात सरकारने तातडीने लक्ष घालावे. वेळप्रसंगी केंद्र शासनाची मदत देखील घ्यावी. मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी शांतता कशी प्रस्तावित होईल, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही उदयनराजे भोसले यांनी केले आहे. दरम्यान आज सकाळी ते पुण्याहून जालन्याच्या दिशेने रवाना होतील
.नेमकी घटना काय?
सरसकट ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंबड व गेवराई तालुक्यातील १२३ गावांनी मंगळवारी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी शासनाने ठोस आश्वासन दिले नसल्याने आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू होते. आंदोलन मागे घेण्याबाबत पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा केली होती; मात्र, आंदोलकांनी नकार दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यात अनेक आंदोलक जबर जखमी झाले.
अश्रूधूर, हवेत गोळीबार
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबारही करण्यात आला. दरम्यान, जरांगे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणार होतो, असा दावा पोलिस प्रशासनाने केला.
जालन्याच्या घटनेचे चौकशीचे आदेश : गृहमंत्री
मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने या लाठीमाराबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाल आहेत. भाजपचे नेते व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीमाराच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.