• Tue. Apr 29th, 2025

लातूर जिल्ह्यातील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना निर्गमित

Byjantaadmin

Sep 1, 2023

लातूर जिल्ह्यातील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना निर्गमित

लातूर (जिमाका): खरीप हंगाम 2023 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ (अग्रिम) रक्कम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केली आहे. हंगाम मध्य (मिड सिझन) परिस्थितीच्या जोखमी अंतर्गत अधिसूचित विमा घटकातील पिकांसाठी ही अधिसूचना निर्गमित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी दिली आहे.

दुष्काळ संहिता 2016 नुसार तीव्र दुष्काळ स्थिती, पावसातील तीन ते चार आठवड्यापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण घट अथवा वाढ (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्केपेक्षा जास्त तफावत), पर्जन्यमानातील असाधारण कमी अथवा जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्केपेक्षा जास्त तफावत), मोठ्या प्रमाणात कीड, रोग यांचा पिकांवरील प्रादुर्भाव (पीक पेरणी क्षेत्राच्या 25 टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव), इतर नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या 25 टक्केपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्यास अशा प्रातिनिधिक सूचकांनुसार  अधिसूचना निर्गमित करण्याची तरतूद आहे.

या बाबींसाठी उपग्रह छायाचित्र, इस्त्रो (ISRO) तथा सॅक (SAC), एमएनसीएफसी (MNCFC) किंवा इतर शासकीय यंत्रणांचा अहवाल, पीक परिस्थितीबाबत शास्त्रज्ञांचे नियमित अहवाल, वर्तमानपत्रात प्रसिध्द बातम्या इत्यादींच्या आधारे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील 60 महसूल मंडळांमध्ये अधिसूचना निर्गमित करुन विमा कंपनीला आदेशित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 60 महसूल मंडळांमध्ये सर्व सोयाबीन पीक विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई रक्कम लवकरात लवकर देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. लाडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed