केंद्रातील मोदी सरकारविरोधात मोट बांधत देशपातळीवरील जवळपास २६ पक्ष ‘इंडिया’ आघाडीत एकत्र आले आहे. याच ‘इंडिया’ आघाडीची तिसरी महत्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील विरोधी पक्षांचे नेते मुंबईत येणार आहेत. पण महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत आहोत. इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरे आमची बाजू मांडतील ते आमचे वकील असल्याचे म्हटले होते. पण आता उध्दव ठाकरेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसमोरच आंबेडकरांसाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची गुरुवार आणि शुक्रवारी अशी दोन दिवस मुंबईत बैठक होणार आहे. यासाठी सहभागी झालेल्या पक्षांतील प्रमुख मुंबईत दाखल झाले आहे. यानंतर यजमान असलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांतील नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उध्दव ठाकरें नी भाजपवर पुन्हा एकदा सडकून टीका केली. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या मविआ आणि इंडिया आघाडीतील प्रवेशावरही मोठं विधान केलं.
प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’त यायचं आहे का हे विचारावं लागेल. प्रकाश आंबेडकर आणि आमची युती आम्ही २३ जानेवारीलाच जाहीर केलेली आहे. आम्ही शिवसेना आणि आंबेडकरांची युती आम्ही जाहीर केली आहे. पण राज्यातील महाविकास आघाडी की देशपातळीवरील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत यायची इच्छा आहे का याबाबत त्यांना प्रकाश आंबेडकरां शी बोलावं लागेल.
‘इंडिया’ आघाडीत आणखी एक नवीन पक्ष ?
आता युती झालीय म्हटल्यावर कुणी तुटण्यासाठी एकत्र येत नाही. त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करुन त्यांची तयारी असेल तर राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीत ते पण येऊ शकतात असे सूचक विधान केले आहे. ठाकरेंच्या या विधानामुळे वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने आणखी एक नवीन पक्ष महाविकास आघाडीतीसह इंडिया आघाडीत दाखल होण्याची शक्यता आहे.
आंबेडकर म्हणाले, आम्ही ठाकरे यांच्या सोबत आहोत. पण महाविकास आघाडीत नाही. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला आम्हाला का बोलावले नाही, याचे उत्तर काँग्रेस (Congress) देऊ शकतील. आमच्या वतीने आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलतील ते आमचे वकील आहेत. त्यांनी आमच्या बाजूने बॅटिंग करणे गरजेचे आहे.आम्ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस ला प्रस्ताव दिला होता. त्याचप्रमाणे आम्ही आताही तयार आहोत. मात्र, आम्हाला का बोलावले नाही, ते काँग्रेसचे नेते सांगू शकतील.