• Wed. May 7th, 2025

पावसाचे दिवस यंदा कमीच, सप्टेंबरच्या सुरुवातीस जोरदार सरी अपेक्षित

Byjantaadmin

Aug 28, 2023
Transparent umbrella under heavy rain against water drops splash background. Rainy weather concept.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ऑगस्ट महिन्यात तुरळक ठिकाणी एखाद-दुसरी जोरदार सर मुंबईकरांनी अनुभवली. मात्र हा विषम वर्षाव केवळ ऑगस्टपुरता मर्यादित नसून यंदा १ जूनपासूनच मुंबईमध्ये पावसाचे असमान पर्जन्यमान झाल्याचे दिसत आहे. १ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळा ऋतुच्या ८८ दिवसांमध्ये केवळ २० दिवसांमध्ये लक्षणीय पाऊसमानाची नोंद झाली आहे. ऑगस्टमध्ये तर केवळ तीन दिवस १० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. या संदर्भात पाऊसमानाच्या पद्धतीचा अधिक अभ्यास होण्याची गरज व्यक्त होत आहे.पावसाळ्याच्या ८८ दिवसांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये ३१ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. तर मुंबई शहरामध्ये सरासरीहून चार टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात पाऊस सक्रिय झाल्यानंतर जूनमध्ये तीनच दिवस ५० मिलीमीटरहून अधिक पाऊस नोंदवला गेला. जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात पाऊस सक्रिय होता. त्यानंतर पुन्हा १६ जुलैपासून पावसाचा जोर वाढला. हा जोर जुलैअखेरपर्यंत कायम होता. त्यानंतर पुन्हा ऑगस्टमध्ये जोर कमी झाला.

सातत्यपूर्ण पावसापेक्षा कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचा प्रकार मुंबईमध्ये यंदा पुन्हा मुंबईकरांनी अनुभवला. या पावसाने टक्केवारी गाठायला मदत केली असली तरी पावसाचा विषम वर्षाव चिंताजनक आहे. यंदा २६ जुलैला २००५ मधील पावसाची आठवण करून देणाऱ्या अतिवृष्टीने उपनगरांमध्ये उपस्थिती लावली. या पावसाचे उपनगरांची एकूण सरासरी गाठायला मदत केली. मात्र ऑगस्टमध्ये पावसामध्ये पडलेल्या खंडाने उकाडा, उन्हाचा ताप याची जाणीव करून दिली. पावसाळ्यामध्ये बदलेल्या या वातावरणाने नागरिकांना आजाराशीही सामना करावा लागला.

गेल्या आठवडाभरापासून मुंबईमध्ये अधूनमधून एखादी जोरदार सर पुन्हा एकदा बरसत आहे. एकूण २१.४ दिवस पावसाचे असतात. मात्र २२ ऑगस्ट, २६ ऑगस्ट आणि २७ ऑगस्ट या तीनच दिवशी २४ तासांत उपनगरांमध्ये अनुक्रमे २४.६, ४४.६ आणि २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कुलाब्यामध्ये २६ ऑगस्ट रोजी २४ तासांमध्ये १०.२ तर २७ ऑगस्ट रोजी २४ तासांमध्ये २३.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित दिवशी फारसा पाऊस नसल्याने मुंबई उपनगरांमध्ये एकूण १४६.८ मिलीमीटर पाऊस तर, मुंबई शहरामध्ये एकूण ८२.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीस जोरदार सरी अपेक्षित

मुंबई उपनगरांत ऑगस्टमध्ये सरासरी ५६०.८ मिलीमीटर पाऊस पडतो. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाची पुन्हा जोरदार सुरुवात होण्यासाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटण्याची वाट पाहावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर धरणक्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाचे वितरण, नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाचे वितरण याचा अभ्यास आणि नोंदी ठेवून त्यानुसार धोरण आखण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *