• Wed. May 7th, 2025

पिकं करपली…

Byjantaadmin

Aug 28, 2023

मराठवाड्यात तीन महिन्यांत ३३ दिवस अत्यल्प पाऊस झाला असून, ५२ दिवस कोरडे आहेत. सध्या सलग २५ दिवस पावसाचा खंड पडला आहे. विभागात सरासरी ३६३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या परिस्थितीत कोरडा दुष्काळ जाहीर करून खरीप पिकविमा लागू करावा आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न बिकट झाला आहे. विभागाची पावसाची वार्षिक सरासरी ७५०.८१ मिलिमीटर असून, यंदा २४ ऑगस्टपर्यंत सरासरी ३६३.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. आजपर्यंत प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची टक्केवारी ७७.२६ टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६७.९४ टक्के पाऊस झाला आहे. जालन्यात ६७.८६, बीडमध्ये ७२.२५, लातूरमध्ये ६९.३४, धाराशिव येथे ७३.२५, नांदेडमध्ये १०९, परभणीत ६०.७१ आणि हिंगोलीमध्ये ८५.२६ टक्के पाऊस पडला आहे.

marathwada crop

 

खरीप पिकांची स्थिती वाईट आहे. सोयाबीन, तूर, कपाशी, मका आदी पिके पिवळी पडली आहेत. पावसाचा खंड कायम राहिल्यास पुढील आठवड्यातपर्यंत बहुतांश पिके वाळण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीचीही शक्यता नसल्याने शेतकरी मदतीची मागणी करीत आहेत. सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये मदत देऊन तत्काळ खरीप पिकविमा लागू करावा अशी मागणी ‘ॲग्रोव्हिजन गट शेती संघा’ने विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या वर्षी खरीप पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाला नाही. पेरणीनंतरही पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला. पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. पावसाचे थोडेच दिवस शिल्लक असून, पुरेसा पाऊस झाला नसल्याने चिंता वाढली आहे.फळबागांनाही पावसाअभावी झळ बसली आहे. मोसंबीची फळगळ सुरू असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळे परिपक्व होण्यापूर्वी मोसंबीची विक्री करण्यात आली आहे. पुढील नऊ महिने फळझाडे जगवणे शेतकऱ्यांसमोरील मोठे आव्हान आहे. विहिरी आणि कूपनलिका कोरड्या असून, फळझाडांना पाणी देण्यासाठी अडचणी वाढल्या आहेत. मध्यम आणि लघु प्रकल्पांतही पाणी नसल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. पिण्याच्या पाण्यासाठी काही जलसाठे राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे खरीप हंगामाचे नुकसान वाढले आहे.

‘दुष्काळाचा आढावा घेणार’

‘पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. रोजगार हमी योजनेद्वारे मजुरांना जास्तीत जास्त दिवस काम देण्यासाठी आढावा घेण्यात येईल. सध्या मराठवाड्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात येईल आणि उपाययोजना जाहीर करण्यात येतील,’ असे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.खरीपातील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. दमदार पावसाची शाश्वती दिसत नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून खरीप पिकविमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तत्काळ जमा करावा.- संजय मोरे,

ॲग्रोव्हिजन गट शेती संघदुष्काळी परिस्थितीचा आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल. त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय होऊ शकेल. संभाव्य दुष्काळी परिस्थितीत रोजगार हमी योजनेद्वारे अधिक कामे देण्यात येतील. मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील स्थितीवर चर्चा होईल.- संदीपान भुमरे, पालकमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *