आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून मैदानात उतरलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रावर उतरलेल्या चांद्रयानाचा दाखला देत आगामी निवडणुकीत EVM भाजपला मतदान करू शकते, असा संशय व्यक्त केला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवले गेले. आणि त्यात यशस्वी देखील झाले. मग EVM च्या मार्फत मतदान कोणाला करायचे हे ठरवणे काय अवघड आहे. जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकते, तर EVM मशीन देखील BJP ला मतदान करू शकते. विषय फार सोपा आहे. समजून घेतला पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजप खासदाराने केले होते वादग्रस्त विधान
उल्लेखनीय बाब म्हणजे तेलंगणातील भाजप नेते तथा निजामाबादचे खासदार डी अरविंद यांनी ईव्हीएमविषयी एक वादग्रस्त विधान केले होते. मतदारांनी कोणत्याही पक्षाला मतदान केले किंवा नोटा बटन दाबले तरी निवडणूक मीच जिंकेल. तुम्ही काँग्रेसला मतदान केले, तर कमळाचा विजय होईल. कारण, ईव्हीएम भाजपलाच मतदान करेल, असे ते म्हणाले होते.
त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटलेत. डी. अरविंद यांचे हे विधान भाजपसाठी अडचणीचे ठरू शकते. जितेंद्र आव्हाड यांनी अरविंद यांच्या याच ट्विटवरून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे.