भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी नुकतेच असे वक्तव्य केले आहे की, ‘‘मतदारहो, तुम्ही कोणतेही बटन दाबा, मत भाजपलाच जाणार. आएगा तो मोदी ही…’’ याचा सरळ अर्थ असा की, भाजप ‘ईव्हीएम’ घोटाळा करून लोकसभा निवडणुका जिंकत आहे. हे सत्यकथन म्हणजे ‘ईव्हीएम’ घोटाळ्यावर शिक्काच आहे, असा आरोप आज ठाकरे गटाने केला आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनात पुढे म्हटले आहे की, ‘ईव्हीएम’ हॅक करून विजय संपादन करणे हेच भाजपचे सूत्र असल्याचे भाजपचे खासदार सांगत असतील तर भारताचा निवडणूक आयोग यावर काय पावले उचलणार आहे? खरे तर निवडणूक आयोगाकडूनही आता कोणत्याच अपेक्षा ठेवता येणार नाहीत. कारण ‘ईव्हीएम’बरोबर सत्तापक्षाने निवडणूक आयोगालाच ‘हॅक’ केले आहे.
निवडणूक आयोगात ‘गुजरात मॉडेल
ठाकरे गटाने म्हटले आहे की, निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही. भाजपच्या केंद्रीय सरकारचा तो हरकाम्या बनला आहे. निवडणूक आयोगात ‘गुजरात मॉडेल’चे अधिकारी आणून त्यांच्याकडून हवी ती बरी-वाईट कामे करून घेतली जातात. महाराष्ट्रात ज्या प्रकारे शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाच्या हातात दिले, त्यामुळे या मनमानीवर शिक्कामोर्तब झाले.
म्हणून सरन्यायाधीशांना हटवले
ठाकरे गटाने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी एका समितीचे गठन केले. यात पंतप्रधान, विरोधी पक्षनेते व सरन्यायाधीशांचा समावेश होता. हा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा केराच्या टोपलीत टाकून सरकारने निवडणूक आयुक्त निवड समितीवरून सरन्यायाधीशांनाच हटवले. न्या. चंद्रचूड यांचा स्वाभिमानी बाणा निवडणूक आयोगाला परवडणारा नसावा व आयोगावर कळसूत्री बाहुली बसविण्यास न्या. चंद्रचूड यांनी विरोध केला असता.
पूर्वी भाजपचेच ईव्हीएमविरोधात आंदोलन
ठाकरे गटाने म्हटले आहे की, ‘ईव्हीएम’ सुरक्षित नाही व मशीनमध्ये सेटिंग करून गोलमाल करता येतो हा पुराव्यासह शोध भाजपनेच लावला. भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तर ‘ईव्हीएम’ घोटाळय़ावर एक ग्रंथ लिहून ‘ईव्हीएम’विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भाजपचे मुलुंडकर नागडे पोपटलालही ‘ईव्हीएम’ घोटाळय़ावर तेव्हा आंदोलन करीत होते, पण 2014 साली सत्ता येताच या मंडळींनी ‘ईव्हीएम’ची पूजा व उत्सव सुरू केला.
ईव्हीएम है तो मोदी ही आयेगा
ठाकरे गटाने म्हटले आहे की, ‘ईव्हीएम है तो मोदी ही आयेगा’ यावर मोहोर उठवून देशभरातील अंधभक्तांनी ‘ईव्हीएम चालिसा’चे पठण सुरू केले. जगातील अमेरिका, युरोप, जपान, जर्मनी, बांगलादेश, फ्रान्ससारख्या राष्ट्रांनी तेथील निवडणूक प्रक्रियेतून ‘ईव्हीएम’ पद्धत मोडीत काढली. ‘ईव्हीएम’ विश्वासार्ह व समाधानकारक नाही हे सिद्ध झाल्यावरच हा निर्णय घेतला, पण विश्वासार्ह नसलेल्या ‘ईव्हीएम’ जनतेचा विश्वास गमावलेल्या मोदी सरकारने सुरूच ठेवल्या. हेच खरे गौडबंगाल आहे व हा भंगार माल का वापरला जातोय ते भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी आता स्पष्ट केले.
आयोग भाजप कार्यालयातच हलवा
ठाकरे गटाने म्हटले आहे की,‘ईव्हीएम’मधून दिलेले मत नक्की कोणाला जाते हा संशय मतदारांच्या मनात असेल तर तो लोकशाहीचा पराभव आहे. निदानपक्षी बटन दाबल्यावर त्यातून आपण दिलेल्या मताचे चिन्ह बाहेर पडावे व समाधान झाल्यावर तो कागद पेटीत टाकावा, या मागणीवरही सरकार चालढकल करीत आहे. आपण ज्यास मत दिले ते त्या उमेदवारास गेले की नाही, या शंकेचे निरसन निवडणूक आयोग करू शकत नसेल तर या भाजपाई बोलक्या बाहुल्यांचा देशाला उपयोग नाही. निवडणूक आयोगाचे कार्यालय भाजप कार्यालयातच हलवलेले बरे.