गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य द्या -शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे आवाहन
लातूर : शैक्षणिक दृष्टया लातूरचा मोठा नावलौकिक आहे. महाराष्ट्र राज्यच नव्हे तर देशभरातून विद्यार्थी लातूरला शिक्षणासाठी येत असतात. लातूरचा निकालही चांगला असतो. तरी शिक्षण संस्था चालकांची आणि शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी गुरुवार, दि. 24 ऑगस्ट रोजी केले.
शिक्षण आयुक्त मांढरे हे लातूर येथे आले असता जिल्हा परिषदेच्या सभागृहात संस्थाचालक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करून विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले, यावेळी मांढरे बोलत होते. यावेळी शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, विस्तार अधिकारी दिलीप हैबतपुरे, पारसेवार, संस्थाचालक संघटनेचे कोषाध्यक्ष प्राचार्य डी. एन. केंद्रे, जिल्हाध्यक्ष रामदास पवार, सरचिटणीस प्रा. गोविंद घार, उपाध्यक्ष जब्बार सगरे, पी. एन. बंडगर, बजरंग चोले, डॉ. भारत घोडके, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कालिदास माने, सतीश मारकोळे, मदन धुमाळ, विष्णू कराड, शिवकांत वाडीकर, परमेश्वर गित्ते आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मांढरे म्हणाले की, आतापर्यंत काही शाळा विनाअनुदानित होत्या त्या आता अनुदानावर आल्या असल्याचे यावेळी मांढरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपस्थित संस्थाचालकांनी अंशतः अनुदानित शाळांना संच मान्यतेमध्ये (2022-23) पासून शिक्षकेत्तर पदे असलेली ग्रंथपाल, लिपीक, प्रयोगशाळा सहायक, ही पदे विद्यार्थी संख्येनुसार मंजूर करावीत, मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट शालार्थ आयडी द्यावा, शिक्षक भरती बाबतची महाराष्ट्र शासनाची पवित्र पोर्टल प्रणाली रद्द करून भरतीचे अधिकार पूर्ववत देण्यात यावेत अशी मागणी प्रा. घार यांनी मनोगत मांढरे यांच्याकडे केली. याला मांढरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.