शेतकऱ्यांनां चार पैसे मिळायला लागले की या सरकारची झोप मोडते आणि शेतकरी विरोधी काम सुरु करते. एवढ्या नीच आणि दळभद्री विचारांचे केंद्र सरकार आजपर्यंत पाहिले नाही, अशा शब्दात खासदार ओमराजे निंबाळकर निलंगा (जि. लातूर) यांनी थेट केंद्र सरकारलाच खडे बोल सुनावले आहेत.कांद्यावरील ४० टक्क्यांच्या निर्यात करावरून शेतकरी संघटनांही चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यासाठी काल राज्यभरात मोठी आंदोलनेही झाली. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने काल दोन लाख मेट्रीक टन कांदा प्रति क्विंटल दोन हजार ४१० रूपये दराने खरेदी करण्याच्या निर्णय जाहीर केला. पण त्यावरही शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. आजही शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यावर खासदारओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
तीन महिन्यांपूर्वी टमाट्यांचे दर वाढले की सरकारने तातडीने टमाटे आयात करण्याचा निर्णय घेतला. तर आता कांद्याचे दर वाढतच होते, की लागलीच ते पाडले. एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही काम करत असल्याचे केंद्र सरकार सांगते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे तातडीने भाव पाडते, मग उदरनिर्वाहाचे शेतीशिवाय दुसरे साधन नसणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आत्महत्याशिवाय काय पर्याय राहतो, हे सरकारनेच सांगावे. गेल्या नऊ वर्षात सरकार शेतकऱ्यांचा केवळ द्वेषच करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी नक्की जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.