राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल केल्याचे वृत्त आहे. अजित पवार यांनी थेट राज्याचे प्रमुख असलेल्या आपल्या नेत्यालाच भरबैठकीत सवाल केल्याने शिंदे गटाचे मंत्री, आमदार चांगलेच नाराज झाल्याचे समोर येत आहे. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडणार असल्याचेही बोलले जात आहे.
शिंदेंनी काढली अजितदादांची समजूत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्यातील मंत्र्यांची शुक्रवारी एक बैठक झाली. बैठकीला सर्वच मंत्री उपस्थित होते. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारला. घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे, असेही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. अजितदादा यांनी जाब विचारताच एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले. मात्र, यामुळे वादाची ठिणगी उडू शकते, हे दिसताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर हा विषय थांबल्याचे सांगण्यात येत आहे.
दादा रोखठोकच – संजय राऊत
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे रोखठोक स्वभावाचे आहेत. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा प्रश्न विचारला असेल. अजितदादांनी जाब विचारण्याबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे, असे राऊत म्हणाले,
बैठकीतील सर्वच मंत्री अवाक्
दरम्यान, अजितदादांनी सर्व मंत्र्यांच्या बैठकीत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्रश्न विचारल्यामुळे बैठकीत उपस्थित सर्वच मंत्री अवाक् झाल्याची माहिती आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. सुरूवातीला तर मुख्यमंत्री शिंदेही अजितदादांच्या या प्रश्नावर आश्चर्यचकीत झाल्याचे दिसले. मात्र, त्यांनी लगेच अजितदादांना ठाण्याच्या रुग्णालयात झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्णांची प्रकृती कशी गंभीर होती, शेवटच्या क्षणी रुग्णालयात किती रुग्ण आले? रुग्णालयावर येणारा ताण आदीची माहितीही शिंदे यांनी अजितदादांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.
अजितदादांची दादागिरी सुरूच
दरम्यान, अजितदादा यांच्या या सवालामुळे शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले आहेत. आपले नेते व राज्याचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनाच अजितदादांनी जाब विचारल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे. मविआत आणि आताही अजितदादांची दादागिरी सुरूच आहे, अशी प्रतिक्रिया काहींनी खासगीत दिल्याचे बोलले जात आहे.
फडणवीसांमुळे मोठा वाद टळला
दरम्यान, अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारल्यानंतर शिंदेंनी अजितदादांना सविस्तर माहिती दिली. यामुळे शिंदे गटाचे मंत्री नाराज झाले.यातून वाद वाढण्याची आणि बैठकीत शाब्दिक चकमक होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर फडणवीस यांनीच मध्यस्थी केली. आणि वेगळा विषय काढून ठाण्याच्या विषयाला बगल दिली. त्यामुळे मोठा वाद टळल्याचे सांगण्यात येत आहे.