हिवरा फाटा : भारत जोडो पदयात्रा शुक्रवारी (ता.११ नोव्हेंबर) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात आली. नगाडे वाजवून यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी सजवलेल्या हत्तीही होता.
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर जुन्या वेशीप्रमाणे मोठी स्वागत कमान उभारण्यात आली होती. तर फटाक्यांच्या आतषबाजीत राहुल यांचे स्वागत करण्यात आले.
बँड पथक, लेझीम पथक, संबळ, सनई वादन, ढोल पथकाच्या वादनात यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी लातूरचे आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, वर्षाताई गायकवाड, माणिकराव ठाकरे, प्रणिती शिंदे, बाळासाहेब थोरात, प्रज्ञाताई सातव यांच्यासह राज्यपरातून आलेले नेतेमंडळी स्वागतासाठी उपस्थित होती. शिवाय परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यातील जाणार्या भारत यात्रींना भारत जोडो यात्रा, असे लिहिलेला चहाचा मग आणि भेट देऊन नांदेड जिल्ह्यातून निरोप दिला.
दरम्यान, वारंगा फाटा येथे सायंकाळी राहुल गांधी यांची कॉर्नर सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती. पण, राहुल यांनी केवळ दोन मिनीटच बोलले. यावेळी त्यांनी यात्रेचा उद्देश सांगत “राजीव सातव आज आपल्यात नाहीत. त्यांची आठवण येतेय”, असे ते म्हणाले.