• Wed. Aug 20th, 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

Byjantaadmin

Aug 18, 2023

मुंबई : माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जन्मदिवस, सद्भावना दिन म्हणून देशभर पाळला जातो. यानिमित्त आज मंत्रालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, भावनिक ऐक्य आणि सामंजस्याने काम करण्याची तसेच हिंसाचाराचा अवलंब न करता विचारविनिमय करुन व संविधानिक मार्गाने मतभेद सोडविण्याची शपथ दिली.

मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शपथ घेतली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *