• Wed. Apr 30th, 2025

जनावरांना लम्पी चर्मरोग मुक्त करण्यासाठी काळजी व सुश्रुषा यावर ८० टक्के भर द्यावा – पशु संवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

Byjantaadmin

Nov 11, 2022

यवतमाळ,( जिमाका ): महाराष्ट्रामध्ये लम्पी चर्मरोग हा साथरोग हाताळणे हे पशुसंवर्धन विभागासमोर मोठे आव्हान होते. मात्र पशुसंवर्धन विभागाने हे आव्हान चांगल्या पद्धतीने हाताळले. यापुढेही दोन महिने हे आव्हान हाताळण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी आणि डॉक्टरांनी जनावरांची काळजी व सुश्रुषा  ८० टक्के आणि २० टक्के मेडिसिन यावर भर देऊन जनावरांना या आजारातून बरे करावे, अशा सूचना पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र  प्रताप सिंह यांनी केले.

लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव बाबत आज श्री.सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय महसूल भवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विद्यापीठाचे सहायक अधिष्ठाता  अनिल भिकाने, पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर क्रांती काटोले उपस्थित होते.  तसेच जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी सहायक आयुक्त पशुसंवर्धन, सहायक पशुधन विकास अधिकारी दूरदृष्यप्रणाली द्वारे सहभागी झाले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. सिंह यांनी पशुधन विकास अधिकारी यांनी सहायक पशुधन विकास अधिकारी यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून सकाळी नऊ ते रात्री नऊ या बारा तासाच्या कालावधीत एकदा तरी गंभीर  असलेल्या जनावरांची पाहणी करावी. तसेच आवश्यक असलेले उपचार करताना पशुपालकांना काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन  करावे. मध्यम आणि गंभीर रुग्णाच्या परिस्थितीत तपासणी, लक्षणे आणि उपचाराचे केस पेपर सांभाळून ठेवावेत. जास्त प्रमाणात औषधीचे डोस देऊ नये. कमी औषधे आणि जास्त सुश्रुषा व काळजी यानेच जनावरे बरी होतील.  विदर्भात पशुपालक जनावरांची काळजी पोटच्या मुलाप्रमाणे घेतात त्यांमुळे येथे मर्तुकिचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास येते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

साथ रोगात मनुष्यबळ सर्वात महत्त्वाची गोष्ट असून शासनाने यासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ घेण्यासाठी मान्यता दिल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लम्पी साथरोग हाताळण्यासाठी आता मनुष्यबळ उपलब्ध झालेले आहे. त्याचबरोबर शासनाने औषधे आणि इतर आवश्यक असलेले साधने खरेदी करण्यासाठी सुद्धा मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पशुपालकांना त्यांच्या जनावरांचा उपचार करतांना आर्थिक बोझा पडणार नाही याची काळजी घेतलेली आहे.

यावेळी डॉक्टर अनिल भिकाने यांनी मार्गदर्शन करताना वासरांना आणि गर्भार जनावरांना लसीकरण पूर्ण करण्यासंदर्भात माहिती दिली. लसीकरणानंतर सुद्धा लंपी साथ रोगाच्या रुग्ण आढळत आहेत. पण हे  रुग्ण  सौम्य ते मध्यम या प्रकारात आढळून येत आहेत. या रुग्णांमध्ये मरतुकी होण्याचे प्रमाण कमी असून हे रुग्ण उपचाराला लवकर प्रतिसाद देऊन बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लसीकरण आणि उपचार प्रोटोकॉल व्यवस्थितपणे पाळावा असे श्री.भिकाणे यांनी यावेळी सांगितले.

सकाळी आयुक्तांनी बाभुळगाव तालुक्यातील नांदोरा, नायगाव, राणी अमरावती, नेर तालुक्यातील आजंती आणि दारव्हा मधील तरनोळी या गावातील गंभीर आणि मध्यम रुग्णांची पाहणी करुन पशुपालकांना औषधे, उपचार आणि लसीकरणाबाबत माहिती जाणून घेतली  तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले.  यावेळी गट विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *