राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार भाजपसोबत आले, तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी अट अजितदादांना थेट पंतप्रधान मोदी यांनी घातली आहे, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.शरद पवार सोबत आले तरच अजितदादांना भाजप मुख्यमंत्री करणार आहे. त्यामुळे अजितदादा वारंवार शरद पवारांची भेट घेऊन त्यांना आमच्यासोबत या अशा दया-याचना करत आहेत, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
गुप्त भेटीमुळे राजकारण सुरूच
पुण्यात नुकत्याच झालेल्या अजित पवार व शरद पवार यांच्या गुप्त भेटीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. ठाकरे गटासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही या गुप्त भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून अशा गुप्त भेटी टाळायला हव्यात, असे मत ठाकरे गट व काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर या भेटीवरून थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. भीष्म पितामहा यांना असे वर्तन शोभत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर आता या भेटीवरून विजय वडेट्टीवार यांनी मोठाच गौप्यस्फोट केला आहे.
...तर स्वप्नही पाहू नका
आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्हाला अशी माहिती मिळत आहे की, या देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांनीच अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र, एक अट मोदींनी घातली. शरद पवार भाजपसोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू, असे मोदींनी अजितदादांना सांगितले आहे. शरद पवार भाजपसोबत आले नाहीत तर तुम्हीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बाळगू नका, असे मोदींनी स्पष्टपणे अजितदादांना सांगितले आहे.
…म्हणून अजितदादांची दया, याचना
विजय वडेट्टीवार म्हणाले, अजित पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे आहे. त्यामुळेच मोदींची अट पूर्ण करण्यासाठी ते वारंवार शरद पवारांची भेट घेऊन त्यांना भाजपसोबत येण्याची विनंती करत आहेत. भाजपसोबत चला म्हणून दया याचना करत आहेत. दरम्यान, अजित पवारांसोबतच्या भेटीवर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार म्हणाले, अजित पवार माझे पुतणे आहेत. त्यामुळे केवळ वडीलकीच्या नात्याने त्यांची भेट घेतली. याच काय चुकीचे आहे? तसेच, मी मविआसोबतच व मविआही एकसंघ राहणार आहे. याबाबत कुणीही मनात संभ्रम बाळगू नये, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले असले तरी ठाकरे गट व काँग्रेसने मात्र राष्ट्रवादी सोबत आली नाहीच तर भाजपविरोधात लढण्यासाठी बी प्लॅन तयार ठेवल्याचे वृत्त आहे.