पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या दिवशी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे हे सगळे टोणगे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. सर्वांनी टुणकन भाजपमध्ये उडी मारली, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली असून पनवेलमध्ये आज मनसेचा निर्धार मेळावा झाला. मेळाव्यात रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग व रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत अजित पवार गट, भाजप तसेच ठाकरे गटावरही सडकून टीका केली.
छगन भुजबळांनी तुरुंगाबद्दल सांगितले असेल…
अजित पवार गटावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर लगेच राष्ट्रवादीतील टोणगे टुणकन भाजपसोबत गेले. कदाचित छगन भुजबळांनी त्यांना सांगितले असेल की, आत (तुरुंगात) काय काय असते. छगन भुजबळांनी सांगितले असेल मी आत (तुरुंगात) जाऊन आलो आहे. त्यामुळे आत जाण्यापेक्षा भाजपसोबत गेलेले चांगले. त्यामुळे हे सर्वजण ‘आत’जाण्यापेक्षा भाजपसोबत गेलेलो बरे, असे विचार करून सत्तेत सहभागी झालेल असतील.
भाजपसोबत येणारे गाडीत झोपतात
अजित पवार व शरद पवार यांच्या गुप्त भेटीवरूनही सध्या राजकारण तापले आहे. पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार माध्यमांपासून लपण्यासाठी गाडीत झोपून गेले, असा आरोप करण्यात येत आहे. मात्र, अजित पवारांनी त्या गाडीत मी नव्हतोच, असा दावा केला आहे. यावरून अजित पवारांची नक्कल करत राज ठाकरेंनी त्यांची खिल्ली उडवली. राज ठाकरे म्हणाले, अजित पवार म्हणतात तो मी नव्हतोच. तो मी नव्हतोच. तुम्हीच बघा भाजपसोबत येणारे आता गाडीत झोपून जात आहेत. वर तो मी नव्हतोच असे सांगणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे.
स्वत:चा पक्ष उभारायला शिका
दरम्यान, नाशिक येथील टोलनाक्यावर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना अडवल्याप्रकरणी मनसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड केली होती. त्यावरून भाजपने मनसेवर टीका केली होती. टोल फोडण्यापेक्षा रस्ते व टोल बांधायला शिका, असा टोला भाजपने मनसेला लगावला होता. त्याचाही राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, मीदेखील भाजपला सांगतो की, इतरांचे आमदार फोडू आपला पक्ष उभा करण्यापेक्षा स्वत: स्वत:चा पक्ष उभा करायला शिका.
चंद्रयान महाराष्ट्रात यायला हवे होते
राज ठाकरे म्हणाले, खड्ड्यांवरून मनसे आता आंदोलन पुकारणार आहे. या आंदोलनासाठी मी आता हिरवा झेंडा दाखवण्यासाठीच आलो आहे. खरे तर चंद्रयान चंद्राऐवजी महाराष्ट्रात पाठवायला हवे होते. चंद्रावरचे खड्डे त्यांना महाराष्ट्रात पाहायला मिळाले असते. या मेळाव्यातून मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एल्गार पुकारणार असल्याचे जाहीर केले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावे, यासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे आंदोलन करावे, अशा सूचनाही राज ठाकरेंनी केल्या. पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मनसेचा हा मेळावा झाला. मेळाव्याला पनवेल आणि रायगडसह कोकणातील मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्ग 2007पासून रखडलेला
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला 2007 मध्ये सुरुवात झाली. तब्बल 16 वर्षे काम सुरू होऊन झाले तरी महामार्गाचे काम रखडलेलेच आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. यापूर्वीच्या कोकण दौऱ्यामध्येही राज ठाकरे यांनी या रखडलेल्या महामार्गावरून चांगलीच टोलेबाजी केली होती. राम वनवासात जाऊन, सीताला घेऊन, रामसेतू बांधून, रावणाला हरवून 12 वर्षांत परत येतो. मात्र, आपल्याकडे 16 वर्षे झाले तरी महामार्गाचे काम होत नाही, हे लाजिरवाणे असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती.
भाजपकडून युतीचा प्रस्ताव
सत्ताधारी भाजपने मनसेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवल्याचा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, भाजपने मनसेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला. पण राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे व अजित पवारांमुळे त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. विशेषतः राज यांनी भाजपचा हा प्रस्ताव अद्याप फेटाळला नसल्यामुळे ते यावर कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आजच्या भाषणात राज ठाकरेंनी मात्र भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे भाजपचा प्रस्ताव स्वीकारण नाही, असे संकेत राज ठाकरेंनी दिल्याचे बोलले जात आहे.