• Thu. Aug 14th, 2025

हे काय चाललंय ?:कळवा रुग्णालयात 4 महिन्यांच्या बाळासह आणखी 4 रुग्णांचा मृत्यू

Byjantaadmin

Aug 14, 2023

ठाणे जिल्ह्यातील कळवा स्थित सरकारी रुग्णालयात गत 24 तासांत 18 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता या रुग्णालयात रविवारी मध्यरात्रीपासून आणखी 4 जण दगावल्याची बाब उजेडात आली आहे. मृतांत एका 4 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे हे विशेष.

गत गुरुवारी कळवा स्थित छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवार सकाळपर्यंत आणखी 18 जण उपचारादरम्यान दगावले. त्यानंतर आता सोमवारी पुन्हा यात 4 जणांच्या मृत्यूची भर पडली आहे. या विचित्र प्रकारामुळे सरकारला चौफेर टीकेचा सामना करावा लागत आहे.

मिंधे सरकार आल्यापासून मृत्यूचे तांडव

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मिंधे सरकार आल्यापासून राज्यात मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे. राज्यात वेळीच मनपा निवडणुका झाल्या असत्या, लोकप्रतिनिधींचे राज्य असते, तर हे बळी गेले नसते, असे ते म्हणाले.

18 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

या प्रकरणी मनसेनेही आक्रम भूमिका घेतली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी ठाणे महापालिका भवनात शिरून आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला. यावेळी रुग्णालयात झालेल्या 18 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल करण्यात आला.

अपुरी डॉक्टरक्षमता अन् रुग्णसंख्येत वाढ

ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय गत 2 महिन्यांपासून नुतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रुग्णांचा सगळा भार छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयावर पडत आहे. अपुरी डॉक्टर क्षमता व रुग्णसंख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे या रुग्णालयात एकाच रात्री 18 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या 18 पैकी 13 रुग्ण ICU तील, तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. 3 दिवसांपूर्वी याच रुग्णालयात एकाच दिवशी 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *