• Wed. Aug 13th, 2025

प्लास्टिकविरोधी कारवाई तीव्र, विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Byjantaadmin

Aug 14, 2023

मुंबई : गणेशोत्सव व त्यानंतर येणाऱ्या सणवारांच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा जोरदार बडगा उगारण्यात येणार आहे. या कारवाईत पालिकेला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही (एमपीसीबी) साथ मिळणार आहे. मंडळाच्या अधिकाऱ्यांचे भरारी पथक या कारवाईत असणार आहे.येत्या १९ सप्टेंबरला लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, नाताळ असे डिसेंबरपर्यंत सणांची रेलचेल सुरू असते. सणासुदीच्या काळात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री सर्रास होते. तसेच, या कालावधीत पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने सणवारांवर लक्ष केंद्रित केले आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असली तरी त्यांची सर्रास विक्री सुरू आहे. पालिकेच्या २४ प्रभागांमध्ये ‘एमपीसीबी’चे २४ अधिकारी, प्रत्येक प्रभागात पालिकेचे तीन व पोलिस दलातील एक अशा पाच जणांच्या पथकाकडून प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे.प्रतिबंधित पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी मुंबई पालिकेचे अधिकारी छापा टाकतात. मात्र फेरीवाल्यांना त्याचा आधीच सुगावा लागत असल्याने फेरीवाला जागेवरून काही वेळ गायब होतात. त्यावर पर्याय म्हणून व कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी एका प्रभागातील अधिकारी दुसऱ्या प्रभागात छापा टाकतील, परिणामी फेरीवाल्यांना अधिकाऱ्यांची ओळख पटणार नाही, असा प्रयोग करण्यात आला. मात्र तो फार यशस्वी झाला नाही. त्यामुळे आता ‘एमपीसीबी’चीही मदत घेतली जाणार आहे.

Anti Plastic Action will be Intensified Action Will be Taken Against the Sellers

पाच हजार किलो प्लास्टिक जप्त

करोनामुळे थंडावलेली प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई १ जुलै २०२२पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तेव्हापासून ३१ जुलैपर्यंत एक हजार ५८६ ठिकाणी फेरीवाल्यांवर छापे टाकण्यात आले. त्यात पाच हजार २८५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईतून तब्बल ७९ लाख ९३ हजार रुपये दंड वसूल केला गेला, तर ३७ प्रकरणांत कायदेशीर कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *