• Wed. Apr 30th, 2025

मला कितीवेळाही अटक करा, पण मी शिवसेनेला त्यागणार नाही-खा.संजय राऊत

Byjantaadmin

Nov 10, 2022

मुंबई: गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अभेद्य राहिली, तुटली नाही. अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयाने शिवसेनेची मशाल भडकली आहे. या महाराष्ट्रात आता एक शिवसेना राहील, ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. आता त्यांना कळेल की, मला अटक करून त्यांनी किती मोठी चूक केली आहे. देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी चूक असेल तर ती म्हणजे संजय राऊतांना (Sanjay Raut) केलेली अटक. आज न्यायालयाने माझी अटक बेकायदेशीर ठरवली. त्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मला कितीवेळाही अटक करा, पण मी शिवसेनेला त्यागणार नाही. मी भगवा घेऊनच जन्माला आलोय, या भगव्याबरोबरच जाईन, असे संजय राऊत यांनी म्हटले. विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर बुधवारी संजय राऊत आर्थर रोड कारागृहातून सुटले. यानंतर ते आपल्या भांडूप येथील निवासस्थानी आले. याठिकाणी संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या दमदार शैलीत भाषण केले.

घराबाहेर जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी पाहून संजय राऊत यांनी म्हटले की, मी नक्की घरीच आलोय ना? मला वाटलं शिवतीर्थावर आलोय, दसरा मेळाव्याला. यंदा माझा दसरा मेळावा चुकला होता. मी आपल्या सगळ्याचा आभारी आहे की, १०० दिवसांनीही तुम्ही माझं स्मरण ठेवले आहे. माझ्या सुटकेनंतर फक्त मुंबई नव्हे तर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे. आज संपूर्ण देशाने पाहिले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कसा असतो. आगामी काळात या महाराष्ट्रात आपल्या शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. गद्दारांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. मुंबई महानगरपालिका आपल्याकडून काढून घेण्यासाठी शिवसेना पक्ष फोडण्यात आला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

मी येत असताना मोहम्मद अली रोडवर मुस्लीम नागरिक शिवसेनेचा जयजयकार करत होते: राऊत

मी आर्थर रोड जेलमधून सुटल्यापासून शिवसैनिकांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे. मी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर उद्धव साहेबांनी फोन केला. त्यांना भरून आलं होतं, मलाही भरून आलं. रस्त्यात अनेकजण उभे होते, ते मला नव्हे तर शिवसेनेला अभिवादन करत होते. मोहम्मद अली रोडवर मुस्लीम समाज शिवसेनेच्या नावाचा जयजयकार करत होता, असे संजय राऊत यांनी सांगितले.

मी तुरुंगात असताना पक्षाचाच विचार करत होतो. माझं आयुष्य हे पक्षासाठीच आहे. मला चिरडणं किंवा संपवणं इतकं सोपं नाही. हे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेलं रसायन आहे. मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, आता आपले १०३ आमदार निवडून येतील, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे यांच्यासारख्या शिवसेनेच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे, असेही राऊत यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed