• Sat. Aug 9th, 2025

एसटी प्रवाशांसाठी खूशखबर: नवीकोरी रातराणी लवकरच रस्त्यावर धावणार; मुंबई-लातूर मार्गावर ही रातराणी चालवण्याचे प्रस्तावित

Byjantaadmin

Aug 13, 2023

मुंबई : एसटीतील रात्रीचा प्रवास आरामदायी होण्यासाठी रातराणी ही प्रतिष्ठित सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. एसटीच्या दापोडी कार्यशाळेत बांधणी झालेली नव्या चेसिसवरील पहिली रातराणीची पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात शनिवारी नोंदणी झाली. मुंबई-कोकणसह मुंबई-लातूर मार्गावर ही रातराणी चालवण्याचे प्रस्तावित आहे. सप्टेंबरअखेर एकूण ५० रातराणी प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन आहे.

st bus ratrani

 

ही आहेत वैशिष्ट्ये

– मुंबई-अक्कलकोट मार्गावर जुन्या चेसिसवर दोन शयनयान गाड्या धावत आहेत.

– नव्या चेसिसवर माइल्ड स्टीलमध्ये (एमएस) बांधण्यात आलेली रातराणी श्रेणीतील ही पहिलीच बस आहे.

– १२ मीटर लांब, २.६ मीटर रुंद आणि ३.६ मीटर उंच अशी बस आकर्षक रंगसंगतीत बांधण्यात आली.

– हवेचा अवरोध कमी करण्यासाठी एरोडायनॅमिक आकार आहे.

– चालक केबिनमध्ये उद्घोषणा यंत्रणा आणि संकटसमयी प्रवाशांना सावध करण्यासाठी अलार्म यंत्रणा कार्यान्वित आहे.

– गाडी मागे घेताना रिव्हर्सिंग कॅमेरा आणि त्यासाठी स्क्रीन चालकाच्या केबिनमध्ये देण्यात आली आहे.

– प्रवासी झोपून प्रवास करू शकतील, अशी व्यवस्था असणारी दोन अधिक एक या प्रमाणे एकूण ३० आसने गाडीत आहे.

– प्रत्येक आसनासाठी स्वतंत्र खिडकी आणि उजेडाचा त्रास कमी करण्यासाठी पडदे लावण्यात आले आहेत.

– प्रत्येक आसनासाठी स्वतंत्र मोबाइल चार्जिंग सुविधा, मोबाइल, पाण्याची बाटली, वृत्तपत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे आणि पर्स अडकवण्यासाठीही सोय करण्यात आली आहे.

– आसनांवरील गादी आणि उशीसाठी रेक्झिनचे कापड असेल.

– वाचनासाठी पांढरे दिवे आणि रात्री वापरासाठी निळ्या प्रकाशाच्या एलईडी दिव्यांची प्रत्येक आसनासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

– वरच्या बाजूला असलेल्या आसनांवर जाण्यासाठी मजबूत शिडी आणि हँडलची व्यवस्था, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आसनांजवळ अवरोध देण्यात आले आहेत.

– दिव्यांग प्रवाशांसाठी पहिल्या क्रमांकाचे आसन राखीव असेल.

संकटाच्या वेळेसाठी विशेष उपाय

– बाहेर पडण्यासाठी मागच्या बाजूला आपत्कालीन दरवाजा, बसच्या छतावर आणि चालकाच्या केबिनमध्ये एक असे चार मार्ग देण्यात आले आहेत.

– काच फोडण्यासाठी गाडीत पुरेसे हातोडे देण्यात आले आहेत.

– आग विझवण्यासाठी चार आणि सहा किलोची प्रत्येकी एक अग्निशमन यंत्रणा. इंजिनने पेट घेतल्यास आग विझवण्यासाठी एफडीएसएस यंत्रणा कार्यान्वित आहे.

नव्या संपूर्ण शयनयान रातराणी श्रेणीतील बसची सेवा मुंबई-कोकण, मुंबई-लातूर मार्गावर देण्याचे प्रस्तावित आहे.

– शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक, वाहतूक, एसटी महामंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *