• Wed. Apr 30th, 2025

सर्वांनी हुंडा प्रतिबंधक कायद्याचे पालन करावे- श्रीमती एस.डी. अवसेकर

Byjantaadmin

Nov 10, 2022

सर्वांनी हुंडा प्रतिबंधक कायद्याचे पालन करावे- श्रीमती एस.डी. अवसेकर
बाभळगाव येथे कायदेविषयक मार्गदर्शन
लातूर, (जिमाका):हुंडा घेणे किंवा देणे हे हुंडा प्रतिबंधक कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही, अशी शपथ घेवून प्रत्येकाने हुंडा प्रतिबंधक कायद्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती एस. डी. अवसेकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविशयक जनजागृती कार्यक्रमाव्दारे नागरिकांचे सशक्तीकरण अभियानांतर्गत बाभळगाव (ता.लातूर) येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी कायदेविषयक शिबिर झाले. या शिबिरात श्रीमती अवसेकर बोलत होत्या.
प्रभारी गटविकास अधिकारी श्री. कोळपे, अॅड. अंजली जोशी, अॅड. छाया अकाते, अॅड. सिध्दिका यावेळी उपस्थित होते.
श्रीमती अवसेकर म्हणाल्य, हुंड्यासारख्या चुकीच्या प्रथा बंद होण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपली स्वतःची मानसिकता बदलली तर समाजाची मानसिकता बदलेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हुंडा प्रतिबंधक कायद्याचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी महिलांचे अधिकार व कौटुंबिक हिंसाचार, लोकन्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांची माहिती दिली. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना व महिलांना मोफत विधी सहाय्य दिले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अॅड. जोशी यांनी मूलभूत कर्तव्य व हक्क, अॅड. अकाते यांनी स्त्री-भृण हत्या, कौटुंबिक हिंसाचार व बालकांचे अधिकार, दयानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी रुद्र बिरीकर यांनी विधी सेवा प्राधिकरण या विषयावर माहिती दिली. श्री. कोळपे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed