• Sat. Aug 9th, 2025

ठाकरेंचा हल्ला:बेडर राहुल गांधींपुढे मोदींची कसोटी!

Byjantaadmin

Aug 12, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अविश्वास ठरावावेळी केलेल्या लांबलचक भाषणावर ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून तिखट टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केलेल्या लांबलचक भाषणात अहंकार, न्यूनगंड, चिडाचिड जास्त होती. मणिपूरवर ते फक्त 3 मिनिटे बोलले. मणिपूरवर ते अगोदरच बोलले असते, तर त्यांना या वयात 2 तास 13 मिनिटांची चिडचिड करावी लागली नसती. मोदींनी त्यांच्या भाषणाने काँग्रेसला मोठे केले. 2024 ला त्यांचा सूर्य उगवणार नाही हे त्यांच्या भाषणाने नक्की केले. ते सूर्याचे मालक नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हणाला ठाकरे गट?

मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी संसदेत दिले. ‘इंडिया’ पक्षाने आणलेल्या अविश्वास ठरावामुळे पंतप्रधानांना लोकसभेत येऊन बोलावे लागले. दोनेक तासांच्या भाषणात मणिपूरवर ते फक्त चार मिनिटे बोलले. बाकी सर्व पुराण तेच तेच आणि तेच त्यांनी काँग्रेसवरच लावले. या त्यांच्या मानसिक यातना आहेत.

नेहरूंचा काय दोष?

पंडित नेहरूंचे जागतिक मोठेपण, काँग्रेसचे स्वातंत्र्य लढय़ातील कार्य या मोदींच्या यातना आहेत व दहा वर्षे सत्ता भोगूनही मोदी यातनांतून दूर होऊ शकलेले नाहीत. मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेहरूंवर फोडले. मग मागच्या दहा वर्षांत तुम्ही सत्ता भोगून काय केलेत? मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, व्ही. पी. सिंग हे बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले व आता दहा वर्षे स्वतः मोदी पंतप्रधान असूनही मणिपूरचे खापर नेहरूंवर फोडणे ही राजकीय दिवाळखोरीच. मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढली जात असताना मोदी पंतप्रधान आहेत व लोक मोदींना जाब विचारीत आहेत. यात नेहरूंचा दोष काय?, असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

सूर्य भाजपच्या मालकीचा आहे का?

आता मोदी म्हणतात, मणिपुरात शांतीचा सूर्य उगवेल. तुम्ही सांगाल तेव्हा उगवायला सूर्य भाजपच्या मालकीचा आहे काय? अविश्वास ठरावाच्या निमित्ताने अनेकांचे मुखवटे गळून पडले व सत्ता पक्षाची चिडचिड अनुभवता आली. संसदेतून बाहेर फेकलेले राहुल गांधींचे भाषण हे त्या चिडचिडीमागचे मुख्य कारण. 10 वर्षांपूर्वीचे राहुल गांधी आज राहिलेले नाहीत. सत्यवचनी व बेडर गांधींसमोर मोदी-शहांच्या नेतृत्वाची कसोटी लागत आहे. अमित शहा यांनी म्हणे लालबहाद्दूर शास्त्रींचा विक्रम मोडणारे प्रदीर्घ भाषण केले. शहांच्या भाषणात धमक्या, इशारे, काँग्रेसला दूषणे याशिवाय दुसरे काय होते? शहा म्हणजे कोणी स्वातंत्र्य लढा आणि जनतेची आंदोलने यातून तावून सुलाखून बाहेर पडलेले नेतृत्व नव्हे. शहा हे मोदींची वैयक्तिक गरज म्हणून गृहमंत्रीपदी बसवले आहेत. हुकूमशहाला त्यांच्या बेकायदेशीर आदेशांची अंमलबजावणी करायला एक जवळचा अंमलदार लागतो.

देशात विरोधकांवर जो दबाव, दहशतवाद सुरू आहे तो अमित शहा यांच्या हाती गृहमंत्रालय व तपास यंत्रणा असल्यामुळेच, पण हे सर्व 2024 नंतर त्यांच्या हाती राहणार नाही. हीच चिडचिड शहा आणि मोदींच्या प्रदीर्घ भाषणांतून दिसली. 2014 व 2019 असा दोन वेळा काँग्रेसचा पराभव करूनही या दोघांना 2024 साली काँग्रेसची भीती वाटते व ते काँग्रेसवरच हल्ला चढवत आहेत. हे त्यांचे मानसिक दौर्बल्य आहे.

मोदींच्या भावना गोठल्या का?

मोदी ज्या राज्यात व देशात जातात, त्या भागाशी आपले भावनात्मक नाते असल्याचे ते सांगतात. इतके भावनात्मक वगैरे नाते होतेच, तर मग मणिपुरात महिलांची नग्न धिंड वारंवार काढली जात असताना पंतप्रधान मोदींच्या भावना गोठून का गेल्या होत्या? अविश्वास ठराव लोकसभेत आणला नसता तर मोदींनी मणिपूरवरचे मौन कधीच तोडले नसते. अविश्वास ठराव कोसळला. तो कोसळणारच होता. यात सरकार पक्षाने ‘जितंमय्या’चा आव आणण्याचे कारण काय? मोदींना अखेर मणिपूरवर तोंड उघडावे लागले व अविश्वास ठरावाचा हेतू सफल झाला.

मोदींची एक्सपायरी डेट 2024?

भाजपमध्ये मोदीनाम व दंगलीशिवाय दुसरे एखादे प्रॉडक्ट असेल तर त्यांनी ते बाजारात आणावे. या प्रॉडक्टची ‘एक्सपायरी डेट’ 2024 पर्यंत आहे व त्यानंतर भारताचा राजकीय बाजार पूर्णपणे बदललेला असेल. पंतप्रधान म्हणतात, सामान्य घरातला मुलगा पंतप्रधान म्हणून बसला, म्हणून तुमची झोप उडाली. सामान्य मुलाप्रमाणे मोदींचे वर्तन गेल्या दहा वर्षांत दिसले नाही. सामान्य घरातील मुलाने सरकारी पैशाने स्वतःसाठी वीस हजार कोटींचे विमान खरेदी केले आहे व ते दहा लाखांचे सूट परिधान करतात. नेहरू वगैरे लोक श्रीमंतीत जन्मास आले व सत्तेवर येताच साधेपणाने जगले. नेहरूंनी तर त्यांची संपत्ती देशाला दान केली. कृष्णाचा मित्र हा गरीब सुदामा होता. मोदींचे मित्र कोण व त्या मित्रांसाठी मोदी काय काय करतात हे राहुल गांधी यांनी सांगितले आहे, असेही ठाकरे गटाच्या मुखपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *