प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरमधील समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेप्रकरणी जया प्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जयाप्रदा यांना 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.चेन्नईमध्ये रायपेटा याठिकाणी जया प्रदा यांच्या मालकीचे चित्रपटगृह आहे. या चित्रपटगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ईएसआयची रक्कम भरलेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.जया प्रदा यांनी कर्मचार्यांशी बोलून त्यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच खटला फेटाळण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली होती. दुसऱ्या बाजुच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर या प्रकरणी जया प्रदा यांच्यासह चित्रपटगृहाचे काम पाहणाऱ्या दोघांनाही सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
रामपूरमधून दोनदा खासदार
जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षाच्या वतीने रामपूरचे लोकसभा मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केले. 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून रामपूरमध्ये विजय मिळवला होता. नंतर सपाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. 2014 मध्ये त्यांनी बिजनौरमधून आरएलडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2019 मध्ये जयाप्रदा रामूरला परतल्या आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.