• Sat. Aug 9th, 2025

वृद्ध,अपंग आणि अंधांना  ‘बाईपण भारी देवा’चा नजराणा ;मुरुडच्या बाहेती कुटुंबाचा ऱ्हदयस्पर्शी उपक्रम 

Byjantaadmin

Aug 11, 2023
वृद्ध,अपंग आणि अंधांना  ‘बाईपण भारी देवा’चा नजराणा  आयुष्यात पहिलांदाच पोहोचले चित्रपटगृहात
मुरुडच्या बाहेती कुटुंबाचा ऱ्हदयस्पर्शी उपक्रम
लातूर/प्रतिनिधी:डोळ्याला काळा चष्मा लावून काठी टेकवत परिसराचा अंदाज घेणारे अंध,कुबड्या आणि व्हील चेअरचा आधार घेत येणारे अपंग आणि आयुष्याच्या सांजवेळेकडे झुकलेले वृद्ध सारे एकत्रितपणे लातुरातील नामांकित ई स्क्वेअर चित्रपटगृहात जमलेले.तिथं कशाला जाणार ? चित्रपट पहायलाच आले होते हे सगळे.निमित्त होतं मुरुडच्या बाहेती परिवारातील सदस्याच्या वाढदिवसाचं.या परिवारानं सुनेच्या वाढदिवसानिमित्त या मंडळींना चित्रपट दाखवला.यातील बहुतांश लोकांनी तर पहिल्यांदाचा तिथं पाय ठेवला.
   मुरुड येथील उद्योगपती डॉ.बाबुलाल बाहेती यांच्या कुटुंबाने सूनबाई स्वाती स्नेहित बाहेती यांच्या वाढदिवसानिमित्त हा अनोखा नजराणा पेश केला.वृद्धाश्रमातील वयोवृद्ध,अंध आणि अपंग लोकांसाठी केवळ हा चित्रपट दाखवण्यात आला.मातोश्री वृद्धाश्रम आणि बुधोडा येथील स्वाधार केंद्रातील वृद्धांसाठी बाहेती यांनी ही मेजवानी दिली.
   शारीरिक व्याधी,व्यंग आणि अपंगत्वामुळे जगण्यावर मर्यादा येतात.त्यातच अनेकजणांना तर कुटुंबानंही नाकारलेलं.म्हणुनच तर वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागलेला.तिथं अशा बाबींना कुठं संधी मिळणार? जगता यावं एवढीच माफक अपेक्षा ठेवत आयुष्य कंठणारी ही मंडळी.त्यांच्यासाठी कांहीतरी खास करावं असा बाहेती परिवाराचा हेतू होता.
    वृद्ध आणि अपंगांनी चित्रपट पाहिला.त्याचा आनंदही घेतला.पण अंधांना काय ? त्यांनीही चित्रपटाचे संवाद ऐकून हा अनुभव घेतला.
जवळजवळ १३० वृद्ध,अपंग आणि अंध यात सहभागी झाले.
    याबाबत यशोदा ई-स्क्वेअर येथे बोलताना बाहेती म्हणाले, “या उपक्रमामुळे वयोवृद्ध,अंध व अपंगांना अविस्मरणीय असा सुखद आनंद मिळालाय.आपण सामान्य जीवन जगतो.आपल्यासाठी हे नेहमीचंच आहे पण या मंडळींना अशी संधी मिळतच नाही.म्हणूनच हा उपक्रम आम्ही राबवला.या वृद्धांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद पाहून समाधान वाटलं.प्रत्यक्षात या लोकांच्या सहवासात राहता आलं.त्यांचं जीवन समजून घेता आलं.ही अनुभूती विलक्षण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *