लातूर जिल्ह्यातील दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक रस्त्यांच्या प्रश्नावर आमदार धिरज देशमुख यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत धिरज देशमुख यांनी केलेल्या बहुतांश मागण्यांना गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. येणाऱ्या काळात लातूरकरांसाठी महत्वाचे असलेले सगळे रस्ते मार्ग मार्गी लागतील, असा विश्वास या निमित्ताने देशमुख यांनी व्यक्त केला.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गनितीन गडकरी यांची ७ आॅगस्ट रोजी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी लातूरमधून जाणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्गांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. रेणापूर तालुक्यातील खरोळा फाटा ते पानगाव रस्ता मंजूर केल्याबद्दल धिरज देशमुख यांनी गडकरींचे मनापासून आभार मानले. नितीन गडकरी यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेते, लोकप्रतिनिधींसोबत कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत.
पक्षभेद विसरून विकासाचा दृष्टीकोन ठेवत गडकरी कायम त्यांना मदत करत असतात. याचा प्रत्यय धिरज देशमुख यांनाही दिल्लीच्या भेटीत पुन्हा आला.लातूर ते टेंभुर्णी हा मार्ग लातूरकरांसाठी अत्यंत महत्वाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. पुणे, मुंबईच्या दिशेने दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून जातात. पण, रस्ता सुस्थितीत नसल्याने वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे लातूर ते टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित व्हावे.
मुंबई बाहेर जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे लातूर- अंबाजोगाई- केज- मांजरसुंभा- जामखेड- नगर- माळशेज- कल्याण असा ‘मुंबई पूर्व पश्चिम द्रुतगती ग्रीन फिल्ड’ मार्ग जाहीर करावा. त्यामुळे मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, नगर जिल्ह्यातील मागास भाग मुंबईला जोडला जाईल. आणि या भागाचा विकास होण्यास मदत होईल. लातूर शहरातील गरुड चौक ते साई चौक (रा. म. ५४८ बी) हा मार्ग वगळता तीनही बाजूस राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गरुड चौक ते साई चौक या मार्गास मंजुरी देवून यास काँक्रीटीकरणाद्वारे चौपदरीकरण करावे.
असे झाल्यास जड वाहतूक या मार्गाने वळवणे शक्य होईल, अशी विनंती देखील देशमुख यांनी गडकरींकडे केली. निवळी (ता. लातूर) आणि कोळपा तांडा (ता. लातूर) येथे रेल्वे मार्गावर उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. त्याच्या बांधकामासाठी निधी मंजूर करावा. तसेच, निवळी (ता. लातूर) ते शिवली (ता. औसा), महापूर (ता. लातूर) ते धवेली (ता. रेणापूर), पोहरेगाव (ता. रेणापूर) ते रायवाडी (लातूर) या मार्गासाठी केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) या योजनेतून निधी द्यावा, या मागण्यांवर नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, याबद्दल देशमुख यांनी त्यांचे आभार मानले.